बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारून काम करा – जिल्हाधिकारी





v महसूल दिनी अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार
यवतमाळ, दि. 1 : महसूल विभागाकडे पाहण्याचा सामान्य नागरिकांचा दृष्टीकोन हा शासन म्हणून असतो. केवळ एकाच विषय नाही तर अनेक वेगवेगळे विषय या विभागात हाताळावे लागतात. या कामाच्या अनुभवातून वैयक्तिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारून अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधिक्षक नरूल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री स्वप्नील तांगडे, व्यंकट राठोड, इब्राहिम चौधरी, स्नेहा उबाळे, माहिती व सुचना अधिकारी राजेश देवते, सेवानिवृत्त तहसीलदार डी.एम.झाडे, विष्णू कुळकर्णी आदी उपस्थित होते. 
काळासोबत तंत्रज्ञान बदलत आहे. हे तंत्रज्ञान आत्मसाद करणे प्रत्येकाची गरज आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, इतर विभागाचा नायक म्हणून महसूल विभाग कार्यरत असतो. केवळ महसूलीच कामे नाही तर शेती, उद्योग, निवडणुका, जनगणना, कृषी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही महसूल विभागाच्या पुढाकाराने होत असते. त्यामुळेच हा विभाग प्रशासनाचा कणा आहे. चांगले काम करण्यासाठी विविध प्रकारचे कायदे, नियम, शासन निर्णय, त्यातील सुधारणा, कलमांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनचालक आणि शिपायांपासून तर जिल्हाधिका-यांपर्यंत सर्व जण झटत असतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या. यात सर्वांनी उत्कृष्ट काम केले. आगामी विधानसभा निवडणुकांमध्येसुध्दा सर्व जण असेच उत्स्फूर्तपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, पंतप्रधानांचा पांढरकवडा दौरा आणि नुकत्याच झालेल्या निवडणुका यात सर्व अधिका-यांनी अतिशय चांगले काम केले. काम करतांना आव्हाने वाढली आहेत. मात्र या कामासोबतच अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या प्रकृतीकडेसुध्दा लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. अपर पोलिस अधिक्षक नरूल हसन म्हणाले, सर्व विभागाची जबाबदारी महसूल विभागावर आहे. देशाच्या विकासात महसूल विभागाचे मोठे योगदान आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद ह्या लोकांना चांगल्या सेवा देण्यासाठी आहे. यात एक समाधान मिळते, असे ते म्हणाले.
यावेळी राजेश देवते, तहसीलदार डी.एम. झाडे, अजय गौरकार यांच्यासह निवडणुकीत तसेच महसूल विभागात उत्कृष्ट काम करणा-या शिपायांपासून तर तहसीलदारांपर्यंत सर्वांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले. संचालन अतुल देशपांडे यांनी तर आभार अतुल राजगुरे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, वाहनचालक, शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी