जिल्ह्यात 2 लक्ष 65 हजार बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन

 



Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Ø शहरी व ग्रामीण भागातसुध्दा गृहभेटीतून बालकांना लस

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात अपेक्षित बालकांची संख्या 2 लक्ष 65 हजार 253 असून एकूण 2642 बुथचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात गृहभेटीतून बालकांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार, आयएमएचे डॉ. दिलीप देशमुख, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, गतवर्षी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचे 93 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. मात्र यावर्षी पूर्ण 100 टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. तसेच एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. लसीकरणासाठी जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील एकूण मुला-मुलींची संख्या किती. ही माहिती तालुकानिहाय अपडेट असायला पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पांचाळ म्हणाले, दरवर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली जाते. मात्र यावेळेस कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना कराव्यात. कापूस वेचणारे कामगार, ऊसतोड कामगार, विटभट्टीवर काम करणारे मजूर, शेळ्या-मेंढ्या पाळणारे निर्वासीत नागरिकांच्या बालकांना लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या शहरात जास्त बुथचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

जिल्ह्यात ग्रामीण भागात 2352 आणि शहरी भागात 290 असे एकूण 2642 बुथवर लसीकरण होणार आहे. तसेच 2021 च्या लसीकरण मोहिमेसाठी अपेक्षित बालकांची संख्या 2 लक्ष 65 हजार 253 असून यात ग्रामीण भागातील 2 लक्ष 8 हजार 499 आणि शहरी भागातील 56 हजार 754 बालकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तीन दिवस गृहभेटीदरम्यान एकूण 4 लक्ष 72 हजार 245 कुटुंबाना तर शहरी भागात पाच दिवस 1 लक्ष 14 हजार 982 अशा एकूण 5 लक्ष 87 हजार 227 कुटुंबाना भेटी देण्यात येणार आहे. गृहभेटीसाठी एकूण 2003 टीमचे गठन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागासाठी 1772 आणि शहरी भागासाठी 231 टीमचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सादरीकरण करतांना सांगितले.  

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी