कोव्हीड लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा



 


यवतमाळ, दि. 7 : आगामी काही महिन्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाच्या दृष्टीने करण्यात येणा-या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला.

नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा. कोव्हीड लसीकरण हे इतर लसीकरण कार्यक्रमापेक्षा पुर्णत: वेगळे आहे व पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोल्ड चेन व पुरवठा चेन बाबत योग्य नियोजन करून ठेवा. लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकरीता धार्मिक नेत्यांना समाविष्ठ करून घेणे आवश्यक आहे. उपविभागीय स्तरावर त्वरीत बैठका घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत ग्रामपातळीवरील यंत्रणांना अवगत करा. तसेच प्रत्येक तालुक्यातून रोज 50 याप्रमाणे जिल्ह्यात एका दिवसात किमान 800 नमुन्यांची चाचणी करा. नमुन्यांच्या चाचण्यांमध्ये नियमितता ठेवा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, कोव्हीड लसीकरण कार्यक्रम मोठा आणि सर्वांसाठीच राहणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे कोटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबत शासनाकडून प्राप्त होणा-या सुचना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात जास्त कालावधी राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंत्रणांनी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करून आपली तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यात लसीचे प्रकार, त्याची सद्यस्थिती व कालावधी, लसीकरीता स्टोअरेजबाबत उपलब्धता आदींचा समावेश होता. बैठकीला विविध विभागांच्या अधिका-यांसोबतच रोटरी क्लब, लायन्स क्लब, रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी