श्रीक्षेत्र धामणगाव (देव) येथील विकास कामे त्वरीत पूर्ण करा - पालकमंत्री राठोड

 

Ø कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा

यवतमाळ, दि. 11 : धामणगाव (देव) येथील श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज देवस्थान विकसीत करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मोठमोठी कामे तर केली जातात, मात्र महत्वाची किरकोळ कामे प्रलंबित राहिल्यामुळे ती वास्तु लोकांच्या सेवेत सुपूर्द करता येत नाही. त्यामुळे या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन विविध विभागांनी समन्वयाने संपूर्ण विकास कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुंगसाजी महाराज देवस्थानच्या विकास आराखड्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मुंगसाजी महाराज देवस्थान हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, इमारतींचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत आदी मोठे कामे पूर्ण केली जातात. मात्र पाणी पुरवठा, विद्युत कनेक्शन, फर्नीचर, सुशोभिकरण अशी कामे प्रलंबित राहतात. परिणामी वास्तु बांधूनही ती उपयोगात आणता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देऊन प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. या वास्तुचे जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.

लोकार्पण झाल्याबरोबर  दुस-याच दिवसापासून ही वास्तु लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे. निधीची कोणतीही कमतरता नसल्यामुळे भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन श्रीक्षेत्र धामणगाव (देव) देवस्थान येथील सर्व विकासकामे अतिशय दर्जेदार पध्दतीने व्हायला पाहिजे. प्रत्येक खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजुला व मुख्य सभागृहाच्या खुल्या जागेत वृक्षारोपण, देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेच्या अनुषंगाने व्यावसायिक पध्दतीचा अवलंब आदी बाबी पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पहिल्या टप्प्यातील सहा कोटींची तीन कामे पूर्ण झाली असून यात पालखी मार्ग, धामणगाव ते कोहळा रस्ता आणि प्रसाधन गृहचा समावेश आहे. तर दुस-या टप्प्यातील 19 कोटींची 11 कामे प्रगतीपथावर असून तीन डिसेंबर अखेर पूर्ण केली जाईल. तसेच खनिज विकास निधीमधील तीन कोटींची पाच कामे असून यात भक्त निवास अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, आवार भिंतीचे बांधकाम, चिंचमंदीर आवारात प्रसाधन गृह या कामांचा समावेश असल्याचे अधिक्षक अभियंता श्री. चामलवार यांनी सांगितले.

बैठकीला यवतमाळ वन विभागाचे उपवनसंरक्षक केशव बाभळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे विभागीय अभियंता श्री. हुंगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी