जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे

 


Ø 50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक

यवतमाळ, दि. 31 : खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतक-यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 31 ‍डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्याची सन 2020-21 ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे असल्याचे जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे.

यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13 लक्ष 9 हजार 592 हेक्टर आर. आहे. 16 तालुके असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 110 महसुली मंडळ, 682 समाविष्ट साझे आणि जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 2159 आहे. यापैकी 2046 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 46 पैसे जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील उर्वरीत 113 गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या 2046 असून यात यवतमाळ तालुक्यातील 135 गावे, कळंब तालुक्यातील 141 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 133, आर्णि तालुक्यातील 106, दारव्हा तालुक्यातील 146, दिग्रस तालुक्यातील 81, नेर तालुक्यातील 121, पुसद तालुक्यातील 185, उमरखेड तालुक्यातील 136, महागाव तालुक्यातील 113, केळापूर तालुक्यातील 130, घाटंजी तालुक्यातील 107, राळेगाव तालुक्यातील 132, वणी तालुक्यातील 155, मारेगाव तालुक्यातील 108 आणि झरीजामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 46 पैसे असली तरी यात यवतमाळ, नेर, केळापूर, घाटंजी, वणी आणि मारेगाव या तालुक्यांची पैसेवारी 46 पैसे, कळंब, बाभुळगाव, आर्णि, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि राळेगाव या तालुक्यांची पैसेवारी 47 पैसे तर झरीजामणी या तालुक्याची पैसेवारी 48 काढण्यात आली आहे. पैसेवारी न काढण्यात आलेल्या गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 17 गावे, कळंब तालुक्यातील 2 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 7, आर्णि तालुक्यातील 5, दारव्हा आणि नेर तालुक्यातील 0, दिग्रस तालुक्यातील 1, पुसद तालुक्यातील 4, उमरखेड तालुक्यातील 22, महागाव तालुक्यातील 3, केळापूर तालुक्यातील 11, घाटंजी तालुक्यातील 15, राळेगाव तालुक्यातील 1, वणी आणि मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 7 आणि झरीजामणी तालुक्यातील 11 गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिका-यांच्या अहवालात नमुद आहे.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी