जिल्हाधिका-यांकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा आढावा


 


यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली.

यावेळी एकूण 12 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात केळापूर तालुक्यातील चालबर्डी येथील मृतक किरण गोणेवार यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ, केळापूर तालुक्यातील आनंद जोशी यांच्या कुटुंबियाकडून रोटावेटरकरीता अर्ज घेणे, पांढरकवडा येथील महेंद्र गोरे यांच्या कुटुंबियांना नरेगातून विहिरीचा लाभ, घाटंजी तालुक्यातील हिवरधारा येथील यशवंत यादव यांच्या पत्नीला विधवा पेन्शनचा लाभ, घाटंजी तालुक्यातील मानोली येथील अनंता पेटकुले यांच्या कुटुंबियांकडून ठिबक सिंचनसाठी अर्ज घेणे, घाटंजी येथील वसंतनगरातील मयूर फुसे यांच्या कुटुंबांना गाई-म्हशीचा लाभ, कळंब तालुक्यातील पहूर येथील देवाजी धुर्वे यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिर तसेच शेतीला कुंपण, नेर तालुक्यातील शेंद्री येथील छगन चौधरी यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत व नरेगातून विहिरीचा लाभ, पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील नीलेश कदम यांच्या कुटुंबियांना गाई-म्हशी वाटपाचा लाभ, पुसद तालुक्यातील अडगाव येथील सुभाष इंगोले यांच्या कुटुंबियांना नेरगा अंतर्गत विहिर, दिग्रस तालुक्यातील माळहिवरा नरेगा अंतर्गत विहिर आणि महागाव तालुक्यातील आमनी येथील श्याम जाधव यांच्या कुटुंबियांना शेळी वाटप तसेच विहिरीचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची प्रकरणे त्वरीत निकाली काढून त्यांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळण्यासाठी ग्रामस्तरीय यंत्रणेने एका आठवड्याच्या आत संबंधित कुटुंबियांकडून कागदपत्रांची पुर्तता करावी. जेणेकरून कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन प्राप्त होईल. यावेळी जिल्हाधिका-यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. तसेच केळापूर तालुक्यातील चालबर्डी येथील कुटुंबाला मराठी येत नसल्याने तेलगू भाषेत संवाद साधला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, पुसद आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, सामाजिक न्याय विभागाचे श्री. चव्हाण संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी