यवतमाळ शहरात 27 ऑगस्ट रोजी 'रानभाजी महोत्सव'

 


Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ, दि. 25 :  कृषीमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 27 ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच जिल्ह्यातील मान्यवर खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. रानावनातील व शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यामध्ये व फळभाज्यामध्ये औषधी गुणधर्म तसेच शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. याबाबत सर्व स्तरातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्या पुर्णपणे सेंद्रिय असतात.

यवतमाळ जिल्हयात साधारणतः तरोटा, आंबुशी, मसालापान, माठ, चवलाई, घोळ, चिवळ, राजगीरा, अंबाडी, गुळवेल, भुईआवळा, चाकवत, आंबटचुका, पुदिना, काठमाठ, फांदी, शतावरी, ओवा पान, गवती चहा, आघाडा, केना, तांदुळजीरा, अळूची पाने, दिंडा, पाथरी, मायाळु, रानशेपु, कुरडु, भारंगी, कपाळफ़ोडी, फोडशी, बोपली इत्यादी भाज्या उपलब्ध आहेत.

तसेच करटोली, वाघाटी , कवठ, बेल, टेंभुर्णी, उंबर, शेवगा, रानभेंडी, चारोळी, वाळुक, शेरणी, आळिंबी, लाल आंबाडी, हरसुल, बिहाडा, हिरडा, बिब्बा, करवंद, आवळा, कुडा ( मुळ्याच्या शेंगा ), भोकर ईत्यादी रानफ़ळेसुध्दा उपलब्ध अहेत. शेवगा फुल, हादगा फुल, जिवती फुल, कुडाची फुल, सकनकळी, शंखपुष्पी, मोह फुल, उतरण आदी फुलभाजीसुद्धा आढळतात. याव्यतिरिक्त सुरण, साखरकंद, बांबु कंदवर्गीय भाज्या उपलब्ध आहेत.

रानभाजी महोत्सवातून ग्राहकांना आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या रानभाजी महोत्सवास भेट द्यावी व शेतकऱ्यांची रानभाजी खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी