पांढरकवडा, पुसद, दिग्रस येथील बाजारपेठ मंगळवारपासून उघडणार


Ø पालकमंत्र्यांनी केल्या प्रशासनाला सुचना

यवतमाळ, दि. 3 : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचनेवरून यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील संचारबंदीत शिथिलता देण्याबाबत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वरील शहरातील बाजारपेठ सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात आली. याच धर्तीवर पांढरकवडा, दिग्रस आणि पुसद येथील संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी व्हीसीद्वारे प्रशासनाला दिले. त्यानुसार आता पांढरकवडा, पुसद आणि दिग्रस येथील बाजारपेठ मंगळवारपासून सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडी राहणार आहे.   

जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, नेर, पांढरकवडा, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे रुग्ण संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी लॉकडाउन संदर्भात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला होता. त्यानुसार येथे शिथिलता देण्यात आली. याच अनुषंगाने पांढरकवडा, पुसद व दिग्रस येथे सुध्दा संचारबंदी उठविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली. या मागणीची दखल घेत अखेर पांढरकवडा, पुसद आणि दिग्रस येथील संचारबंदी उठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

मात्र जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारपेठ उघडी असतांना व सायंकाळी 5 नंतर कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेल्या शहरातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही, विनाकारण गर्दी केली आणि पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली तर मग प्रशासनासमोर वरील शहरात पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी