वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बिनधास्तपणे वागणे सोडा

 



Ø जिल्हाधिका-यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

Ø जिल्ह्याचा मृत्युदर 2.68 टक्के, बरे होण्याचा दर 63 टक्के, पॉझेटिव्ह रुग्णदर 7.7 टक्के

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गत चार दिवसांत रोज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या शंभरी पार करीत आहे. शासनाच्या धोरणानुसार आपण ‘अनलॉक’ प्रक्रियेमध्ये असलो तरी नागरिकांनीसुध्दा जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे अजूनही गांभीर्य नाही. त्यामुळे स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी आतातरी बिनाधास्त वागणे सोडा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोनाविषयक माहिती देण्यासाठी नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात तीन पॉझेटिव्ह रुग्णांपासून सुरवात झाली असून आजघडीला हा आकडा 1865 वर पोहचला आहे. तरीसुध्दा नागरिकांना याचे गांभीर्य नाही, ही खेदाची बाब आहे. अनेक जण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बिनधास्तपणे फिरतांना आढळतात. शासनाकडून दंड वसूल केला जातो. मात्र दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांनाच स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची जास्त काळजी असायला पाहिजे. कोरोनामध्ये प्रशासनातर्फे वेगळे काही करायची गरज नाही. सर्व शासनाच्या निर्देशानुसारच होते.

जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत 44 जणांना ही सुविधा देण्यात आली असून यासंबंधित शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. लक्षणे नसली तरी पहिले दोन दिवस कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणी केली जाते. होम आयसोलेशन हवे असणा-या व्यक्तिच्या घरी चार स्वतंत्र खोल्या, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर त्याने स्वत: विकत घेऊन स्वत:चे एसपीओटू चेक करावे व डॉक्टरांना त्याबाबत अवगत करावे. कोरोनासंदर्भात खाजगी रुग्णालयात तसेच दुस-या जिल्ह्यात उपचाराची सुविधा आदी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार देण्यात येत आहे. खाजगी डॉक्टरांनी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण तपासण्यासंबंधी प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाही. ॲन्टीजन किटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. यात जिल्ह्यासाठी 32500 किट खरेदी करण्यात आल्या असून आणखी 30 हजार किट खरेदी करण्याला मंजूरी देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

10 मार्च रोजी जिल्ह्यात सर्वात प्रथम पॉझेटिव्ह रुग्ण आढळले होते. आज ही संख्या 1865 वर गेली आहे. यापैकी 1250 जण बरे होऊन घरी गेले आहेत. यात 707 पुरुष आणि 543 महिला आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 579 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि इतर जिल्ह्यातील पाच जण असे एकूण 584 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. सुरवातीच्या अडीच महिन्यात म्हणजे 29 मे पर्यंत पहिल्या 150 ते 160 रुग्णांमध्ये जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. आज मात्र जिल्ह्यात मृत्युचा आकडा 50 असून 32 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील 13, नेर शहर व ग्रामीण भाग प्रत्येकी दोन, दारव्हा शहरातील तीन, दिग्रस शहरातील तीन व ग्रामीण भागातील दोन, आर्णि शहरातील दोन, पांढरकवडा शहरातील दोन, महागाव शहरातील दोन, उमरखेड शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी तीन, पुसद शहरातील नऊ व ग्रामीण भागातील दोन, झरी ग्रामीण भागातील एक, कळंब ग्रामीण भागातील एकाचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे 581 रुग्ण भरती झाले असून यापैकी 56 पॉझेटिव्ह आले आहेत. सारी आणि कोरोना पॉझेटिव्ह असलेल्या 43 आणि फक्त सारी असलेले 42 जण असे एकूण 85 मृत्यु झाले आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 137 प्रतिबंधित क्षेत्र आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन याप्रकारे 265 पथकाद्वारे एकूण 530 कर्मचा-यांकडून घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत 9500 घरांचा सर्व्हे झाला असून 2120 नमुने घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील 37 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण बेडची क्षमता 2956, सहा कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये बेडची क्षमता 580 आणि वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन वॉर्डात 500 बेड असे जवळपास चार हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ 15 टक्के बेड उपयोगात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व कोव्हिड केअर सेंटरमधील आतापर्यंत 284 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील 186 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि वैद्यकीय महाविद्यालयातील 101 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गृह विलगीकरणात आतापर्यंत 3495 तर संस्थात्मक विलगीकरणात 136 जण दाखल झाले. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून 92 फिवर क्लिनीक सुरु करण्यात आले. याद्वारे आतापर्यंत 18157 जणांची तपासणी करण्यात आली आहे.

10 मार्च ते 7 जूनपर्यंत 2300 नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात व्हीआरडीएल लॅब सुरु झाल्यानंतर 7 जूनपासून आतापर्यंत जवळपास 25 हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक तहसीलमधून रोज किमान 50 नमुन्यांची तपासणी करण्यात येते. याप्रमाणे ॲन्टीजन आणि आरटीपीसीआर दोन्ही मिळून रोज 800 नमुन्यांची तपासणी होत आहे. जिल्ह्यात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे 300 नमुन्यांची तपासणी करण्यात येते. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ही संख्या 140 असून आपल्या जिल्ह्यात 200 टक्के तपासणी होत आहे. त्यामुळे संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग चांगली होते. जिल्ह्यात मृत्यु दर हा 2.68 टक्के असून पॉझेटिव्ह रुग्णाचा दर हा 7.7 टक्के आहे. पॉझेटिव्ह दर हा 10 टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

००००००

 

 

Comments

  1. Kalamb gramin yethil rugn possitive kadhi sapdla ani mrutyu kasha mule zala?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी