गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – जिल्हाधिकारी सिंह


 


Ø घरीच मूर्ती स्थापन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि. 18 : राज्यात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. दरवर्षी जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात व अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची व इतर नागरिकांची काळजी घेत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

गतवर्षी जिल्ह्यात 1700 सार्वजनिक मंडळे होती. यावर्षी यापैकी जवळपास 500 सार्वजनिक मंडळानी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्धार केला असून घरीच बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. इतरही सार्वजनिक मंडळांनी असा आदर्श निर्माण करून अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करावा. गणेशाची मूर्ती स्थापन करतांना घरी दोन फूट तर सार्वजनिक ठिकाणी चार फुटापर्यंतच मूर्ती असावी. तसेच आरती, पूजा करतांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फेसबूक लाईव्ह, डीजीटल मिडीया, यु-ट्यूब, वेब पोर्टलच्या माध्यमातून इतरांना पुजेमध्ये सामील करून घ्यावे. जेणेकरून लोक एकमेकांच्या संपर्कात येणार नाही व गर्दी होणार नाही. गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक टाळावी.

अशाच प्रकारच्या सुचना 21 ऑगस्टपासून सुरू होणा-या मोहरमबाबतसुध्दा देण्यात आल्या आहेत. मुस्लीम बांधवांनी काळजी घेऊन हा उत्सव साजरा केला तर स्वत:साठी व जिल्ह्यासाठी योग्य राहील. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करण्याचे टाळावे – पोलिस अधिक्षक एम. राजकुमार

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक मंडळ स्थापन करणे टाळावे. यावर्षी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला नाही तर पुढील वर्षी मंडळाची परवानगी मिळणार नाही, यावर कोणीही विश्वास ठेवू नये. पुढील वर्षी मंडळांना रितसर परवानगी नक्की मिळेल. ज्या सार्वजनिक मंडळांना मूर्तीची स्थापना करावयाची आहे, त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानात / शेडमध्ये / हॉलमध्ये गणेशाची मूर्ती बसवावी. जेणकरून रस्त्यावर गर्दी होणार नाही. तसेच बाप्पाच्या आगमनावेळी व विसर्जन करतांना मिरवणूक काढू नये. विसर्जनाच्या दिवशी जागेवरच आरती करावी. न.प.तर्फे विसर्जनासाठी आपली मूर्ती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा तसेच हा आरोग्य उत्सव असायला पाहिजे, असे जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले. 

शासनाच्या मार्गदर्शक सुचना :  

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार यशोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

            श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

            आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुर्षणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच मास्क, सॅनीटायझर इ. स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी