कोरोनाबाधितांसाठी खाजगी रुग्णालयात 30 टक्के बेड राखीव ठेवा - पालकमंत्री संजय राठोड




                            

Ø वैद्यकीय महाविद्यालयात घेतला आढावा

Ø पीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांची विचारपूस

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पीटल, जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेडची  व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात 30 टक्के बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यंत्रणेला दिले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राज कुमार, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता रुग्णांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील मोठे खाजगी रुग्णालयात 30 टक्के बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव तर इतर रुग्णांसाठी 70 टक्के बेड असले पाहिजे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर खाजगी रुग्णालयातील 50 टक्के बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवले जातील. त्यानंतर ही रुग्णालये अधिग्रहीत सुध्दा करण्यात येतील.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेडची व्यवस्था तातडीने करावी.  प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सीजन पुरवठा झाला पाहिजे. कोव्हीड हॉस्पीटल व्यतिरिक्त सर्जरी वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 ऑक्सीजन पॉईंट वाढवा. तसेच येथे ऑक्सीजन प्लाँट तयार  करता येईल का, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनचे 500 सिलिंडर येत होते. मात्र ही संख्या आता दुप्पट करण्यात आली असून रोज एक हजार सिलींडर येणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणा-या डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टीस करू नये. असे प्रकार आढळले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

केवळ मेडीसीन विभागाच्या डॉक्टरांनीच कोरोनाबाधितांवर उपचार न करता, सर्जरी, आर्थोपेडीक व इतरही विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर्स, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी संयुक्तरित्या रुग्णांवर उपचार करावे. येथे रिक्त असलेली डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदी पदे तातडीने भरण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील उपचाराबाबत रुग्ण समाधानी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी पीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डात भेट दिली. तसेच उपचार आणि येथे पुरविण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णांची संवाद साधला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी केली.

बैठकीला महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, मेडीसीन विभागाचे डॉ. बाबा येलके, डॉ. गणेश जाधव, डॉ. रवी राठोड यांच्यासह जि.प. सभापती श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यशवंत पवार तसेच नर्स प्रभा चिंचोळकर, वनमाला राऊत आदी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी