जिल्हाधिका-यांनी घेतला तीन तालुक्यांचा ‘ऑनफिल्ड’ आढावा

 



Ø मृत्यु होऊ न देण्यासाठी गांभिर्याने सर्व्हे करण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची तसेच मृत्युच्या आकड्यांची वाढ लक्षात घेता यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी तीन तालुक्यांचा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेतला. तसेच मृत्यु होऊ न देण्यासाठी आपापल्या तालुक्यात गांभिर्याने सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केळापूरसह घाटंजी आणि झरी जामणी तालुक्याचा येथील नगर परिषदेच्या सभागृहात आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. पी.एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश कहाळे आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, आयएलआयची लक्षणे असलेला रुग्ण सारीमध्ये जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आयएलआय सदृश्य लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून घ्यावी.  तसेच को-मॉरबीड (पूर्व व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण) नागरिकांच्यासुध्दा तपासण्या कराव्यात. कॉलसेंटर वरून नियमितपणे को-मॉरबीड व्यक्तींची चौकशी करणे अनिवार्य आहे. यात निष्काळजीपणा करू नका. त्यांना ताप किंवा सर्दी असल्यास त्वरीत कोव्हीडची चाचणी करणे आवश्यक आहे. कॉल सेंटरबाबतचे सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवावे. कॉल करून शोधलेल्या व्यक्तिंच्या चाचण्या केल्यानंतर किती व्यक्ती पॉझेटिव्ह आलेत, याची रजिस्टरमध्ये अचूक नोंद ठेवावी.

            प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तिंच्या तपासणी करून घ्याव्यात. होम आयसोलेशनची सुविधा देतांना सदर व्यक्ती अटी व शर्तींचे पालन करतात की नाही, याची खात्री करूनच परवानगी द्यावी. तसेच त्यांच्या घरातील सर्व व्यक्तिंची तपासणी करावी. सर्व पॉझेटिव्ह व संशयित व्यक्तिंचे एक्स –रे काढून घ्यावेत. सारीची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्तिंची चाचणी करा. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिचा मृत्यु होणार नाही, याची दक्षता घ्या.

            कृषी क्षेत्राबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून जास्तीत जास्‍त लोकांना लाभ मिळाला पाहिजे, याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे. यामध्ये निवड झालेल्या व्यक्तिंना पोकरा अंतर्गत किती घटकांचा लाभ देता येतो, याची यादी तयार करा. जास्तीत जास्त लोकांचे अर्ज लाभ घेण्यासाठी आले पाहिजे, यासाठी शेतक-यांच्या सभा ग्रामपातळीवर आयोजित करा. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचाविण्यासाठी पोकरा योजना आहे. त्यासाठी कृषी विभागाने ग्रामस्तरावर शेतकरीनिहाय सुक्ष्म नियोजन करावे. तसेच पीक फवारणी करतांना एकाही व्यक्तिचा मृत्यु होणार नाही, याची काळजी घ्यावी व याबाबत शेतकरी व शेतमजुरांमध्ये जनजागृती करावी.

            प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नरेगाची कमीत कमी पाच कामे सुरु झाली पाहिजे. यासाठी गटविकास अधिका-यांनी नियोजन करावे. विहीर पुनर्भरणसारखी कामे प्राधान्याने करा. जेणेकरून हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी पातळी योग्य राहून शेतक-यांना रब्बी हंगामातील पिके घेता येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड हेल्थ केअर सेंटरला भेट देऊन स्वच्छता व साधन सामुग्रीबाबत वैद्यकीय अधिक्षकांसोबत चर्चा केली. घाबरू नका, पण स्वत:चीसुध्दा काळजी घ्या, असे त्यांनी येथील कार्यरत डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचा-यांना सांगितले.

            बैठकीला तिनही तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

०००००००

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी