व्यापारी संघटनांचा 'जनता कर्फ्यू'चा निर्णय अभिनंदनीय - पालकमंत्री संजय राठोड

 

                                       

Ø नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मृत्युचा आकडाही वाढत आहे. तरीसुध्दा काही नागरिक अतिशय बेजबाबदार पध्दतीने वागत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांकडूनच संसर्गाचा जास्त धोका निर्माण होत आहे. याबाबत शासन आणि प्रशासनाने नागरिकांना जबाबदारपणे वागण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने स्वत: समोर येऊन ' जनता कर्फ्यू' चा घेतलेला निर्णय अतिशय अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.

वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी यवतमाळमध्ये व्यापारी संघटनांचा मंगळवारपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू राहणार आहे. एकप्रकारे हे शासन आणि प्रशासनाला मोठे सहकार्य आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन अनावश्क बाहेर जाणे टाळावे. तसेच नियमित मास्कचा वापर करावा. मास्क न घातल्याने आपण संसर्गाचा शिकार होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. या गोष्टीला आतातरी नागरिकांनी गांभिर्याने घ्यावे. जिल्ह्यात सद्यस्थितीत बेडची कमतरता भासत आहे. कोव्हीड रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर याव्यतिरिक्त निर्माणाधीन असलेल्या सुपर स्पेशालिटी, स्त्री रुग्णालयात अतिरिक्त 500 बेडची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय खाजगी रुग्णालयातील बेडसुध्दा राखीव ठेवण्यासाठी सांगण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील बेडही कोरोनाबाधितांसाठी घेतले जाणार असल्यामुळे सद्यस्थितीत बेडची किती नितांत गरज आहे, हे यावरून नागरिकांनी लक्षात घ्यावे.

त्यामुळे नागरिकांनी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करून सुचनांचे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरू नका. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. विनाकारण 500 रुपयांचा दंड किंवा फौजदारी कारवाईला सामोरे जाऊ नका. त्यापेक्षा स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी घरातच सुरक्षित रहा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणा-या नागरिकांवर तसेच दुचाकीवर विनाकारण तीन जण जात असेल तर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राज कुमार यांना दिले.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी