प्रतिष्ठान सुरू ठेवल्यामुळे पॉझेटिव्ह कुटुंबाच्या संपर्कातील व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल


       यवतमाळ, दि. 26 : पॉझेटिव्ह व्यक्तिच्या कुटुंबातील हाय रिस्क काँटॅक्टमध्ये असलेल्या नागरिकाने शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून आपले प्रतिष्ठान ग्राहकांसाठी उघडे ठेवल्यामुळे सदर व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील पळसवाडी कॅम्प येथे राहणा-या या कुटुंबाचे नगर परिषदेच्या बाजुला चर्चजवळ प्रतिष्ठान आहे.

            व्हॉट्सॲप वर मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबातील काही जण 20 सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार पॉझेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. यांच्या कुटुंबातील हाय रिस्क संपर्कात असलेल्या व्यक्तिंचे नगर परिषदेजवळ प्रतिष्ठान आहे. त्यांनी शासनाच्या आदेशानुसार  पुढील 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन न करता आपले प्रतिष्ठान उघडे ठेवून साहित्याची विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या प्रतिष्ठानमधील कर्मचारी तसेच त्या ठिकाणी येणा-या ग्राहकांना कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या नेतृत्वात न.प.आरोग्य अधिकारी डॉ. विजय अग्रवाल, लोहारा तसेच मोहाचे तलाठी, शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांनी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सदर प्रतिष्ठानला भेट दिली असता प्रतिष्ठान खुले होते. तसेच त्या ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहकसुध्दा उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

            त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील व्यक्तिंनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रतिष्ठान उघडे ठेवल्यामुळे त्यांच्याविरुध्द भादंवी 1860 चे कलम 288, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 नुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी