स्त्री रुग्णालयात कोरोनाबाधितांकरीता 300 बेड त्वरीत तयार करा - पालकमंत्री संजय राठोड

 





                                           

Ø निर्माणाधीन स्त्री व नवजात शिशु रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कोव्हीड हॉस्पीटल, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली असली तरी भविष्यात ही संख्या कमी पडू शकते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्त्री व नवजात शिशु रुग्णालयात त्वरीत 300 बेडची व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

पोस्टल ग्राऊंड समोरील निर्माणाधीन असलेल्या स्त्री रुग्णालयाची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे, असे सांगून पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, सुपर स्पेशालिटीच्या हॉस्पीटलच्या धर्तीवर स्त्री रुग्णालयातही ऑक्सीजनची व्यवस्था असणारे बेड तयार असले पाहिजे. स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक फिटींग व इतर किरकोळ कामे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्वरीत पूर्ण करा. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालय मिळून कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 ते 600 बेडची व्यवस्था होऊ शकते. खाजगी रुग्णालयातही 30 टक्के बेड कोव्हीडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश कालच्याच बैठकीत दिले आहे.

उपचाराकरीता डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर स्टाफ मागणीचे पत्र शासनाला कधी पाठविले, त्याची माहिती त्वरीत द्या. शासनाकडे याबाबत आपण प्राधान्याने पाठपुरावा करून वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देऊ. कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता उर्वरीत काम त्वरीत पूर्ण केले नाही, तर संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईसुध्दा केली जाऊ शकते. त्यामुळे या बाबीला अत्यंत गांभिर्याने घ्या व हे रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी लवकर कार्यरत होईल, यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी स्त्री व नवजात शिशु रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

पोस्टल ग्राऊंडसमोर निर्माणाधीन असलेले हे स्त्री रुग्णालय पाच हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात येत आहे. यात मुख्य इमारत, संरक्षण भिंत, फर्नीचर, इलेक्ट्रिक फिटींग, अंतर्गत वैद्यकीय सोयीसुविधा आदींचा समावेश असून याठी 37.40 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मंजूर आहे. सदर काम नागपूर येथील राधिका ॲन्ड कंपनी करणार आहे.

बैठकीला डॉ. मनोज तगडपिल्लेवार, डॉ. मनोज सत्यपाल, डॉ. मनवर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, पराग पिंगळे आदी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी