गृहभेटीत पूर्वव्याधीग्रस्त व लक्षणे असलेल्यांचा गांभिर्याने शोध घ्या -जिल्हाधिकारी सिंह

 





                                              

Ø ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ व कोव्हीडचा आढावा

यवतमाळ, दि. 21 : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही बाधितांचा व मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. योग्य सर्व्हेक्षण झाले तर निश्चितच या दोन्ही बाबींवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे गृहभेटीदरम्यान पूर्वव्याधीग्रस्त व लक्षणे असलेल्या नागरिकांचा गांभिर्याने शोध घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

यवतमाळ, दिग्रस, पुसद, वणी आणि मारेगाव या तालुक्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.

गृहभेटीदरम्यान सारी, आयएलआयची लक्षणे असणारे व पूर्वव्याधीग्रस्त रुग्णांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व्हेमध्ये आपला जिल्हा मागे पडता कामा नये. पहिल्या टप्प्यात गांभिर्याने काम केले तर मोहिमेचा दुसरा टप्पा आपल्यासाठीच सोपा जाईल. प्रत्येक पथकाद्वारे रोज 50 गृहभेटी होतात की नाही, यात लक्षणे असलेले व को-मॉरबीड किती आढळले, याचा दैनंदिन आढावा तालुका यंत्रणेने न चुकता घ्यावा. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाला रोज अवगत करावे. राज्य शासन या मोहिमेबाबत अतिशय संवेदनशील असून प्रत्येक जिल्ह्याची कामगिरी तपासली जाणार आहे. त्यामुळे जे शासकीय कर्मचारी गृहभेटीकरीता नकार देत असेल त्यांना नोटीस बजावावी. जिल्ह्यातील जवळपास 8 लक्ष कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून 15 दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यासाठी गृहभेटींची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

कोव्हीड – 19 चा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक पॉझेटिव्ह रुग्णामागे किमान 20 ते 30 संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे अपेक्षित आहे. मात्र काही तालुक्यात हे प्रमाण अतिशय कमी आहे. केवळ संख्या वाढविण्यासाठी कुणाचेही नमुने तपासू नका तर पॉझेटिव्ह रुग्णांचे हाय रिस्क, लो- रिस्क व किरकोळ संपर्कातील नागरिकांच्या नमुन्यांची चाचणी करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेकरीता अतिशय सुक्ष्म नियोजन करा. राज्य स्तरावरून याबाबत नियमित आढावा घेण्यात येत आहे. डाटा एन्ट्रीचे काम मागे पडू देऊ नका. यवतमाळ, वणी, पुसद, दिग्रस येथे काँटॅक्ट ट्रेसिंग कमी असल्यामुळे या तालुक्यात मृत्युचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वत: फिल्डवर उतरून काम करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

आतापर्यंत यवतमाळ तालुक्यात एकूण 1246 जण पॉझेटिव्ह आले असून 2721 जणांचे नमुने घेण्यात आले आहे. पुसद येथे 962 पॉझेटिव्ह व 6535 जणांचे नमुने, दिग्रस येथे 736 पॉझेटिव्ह व 5037 नमुने, वणी येथे 540 पॉझेटिव्ह व 5359 नमुने आणि मारेगाव 46 पॉझेटिव्ह व 1276 नमुने घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, डॉ. शरद जवळे, डॉ. व्यंकट राठोड यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.  

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी