नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री राठोड

 



यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले आहे.

जिल्ह्यात केवळ जून महिना वगळता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच पाऊस बरसला. पेरणी झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली राहिली. मात्र आता पीक हाती येण्याच्या वेळेस या महिन्यात धो-धो पाऊस कोसळल्यामुळे हातचे पीक जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना तर कोंबे फुटली असून कपाशीलासुध्दा फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे हातातील उभे पीक सततच्या पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामस्तरावरील यंत्रणेने नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावे. यात कोणतीही चालढकल करू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सततच्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून या पुरामुळे शेतातील पिके खरवडून गेल्याचे चित्र आहे. तसेच शेतक-यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन काढणीला आले असतांनाच पावसामुळे झाडांच्या शेंगांना कोंबे फुटली असून कपाशीची बोंडेसुध्दा काळवंडून सडली आहे.

जिल्हयात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र 8 लक्ष 97 हजार 370 हेक्टर असून यापैकी सोयाबीनचा पेरा 2 लक्ष 81 हजार 673 हेक्टरवर तर कपाशीची लागवड 4 लक्ष 65 हजार 562 हेक्टरवर करण्यात आली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी