1 ते 16 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोध मोहीम

 यवतमाळ, दि. 28 : कोरोना महामारीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे राज्य शासनाने संयुक्तरित्या रुग्ण शोध मोहीम राबविण्याच्या सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार रोखणे, तसेच समाजामध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 1480 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना निश्चय पोषण योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये प्रमाणे औषधोपचार कालावधीकरीता लाभ देण्यात येत आहे. तसेच 1 एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात 158 कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्याकरीता ग्रामीण भागातील 22 लक्ष 69 हजार 859 व शहरी भागातील 2 लक्ष 1 हजार 67 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत केले जाणार आहे. यासाठी ग्रामीण भागाकरीता 2395 व शहरी भागाकरीता 154 पथके नेमण्यात आली आहेत. गृहभेटीमध्ये कुटुंबातील महिला सदस्याची तपासणी आशा स्वयंसेविका तर पुरुष सदस्यांची तपासणी पुरुष स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे. गृहभेटीसाठी येणा-या पथकातील सदस्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

सदर मोहिमेच्या यशस्वीतेकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्रशांत पवार आदी सहकार्य करीत आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी