शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 


यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत आणि उमरखेड पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण पाचपैकी चार प्रकरणे निकाली काढण्यात आली असून शासकीय योजनांकरीता पात्र ठरविण्यात आली आहे. यात कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथील अजय वड्डे यांच्या कुटुंबियांना नरेगाअंतर्गत विहीर मंजूर करण्यात येईल तसेच इतरही योजनांचा लाभ देण्यात येईल. उमरखेड तालुक्यातील जनुना येथील संदीप राठोड यांच्या कुटुंबियांना पशुसंवर्धन योजनेतून लाभ, दारव्हा तालुक्यातील खेड येथील मुरलीधर जाधव यांच्या कुटुंबियांना नरेगामधून विहिरीचा लाभ, दारव्हा तालुक्यातील लोही येथील रुपेश सिंहे यांच्या कुटुंबियांना पशुसवंर्धन योजनेतून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची प्रकरणे त्वरीत निकाली काढून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याला आपले प्राधान्य आहे. जेणेकरून कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन प्राप्त होईल. यावेळी जिल्हाधिका-यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांची आस्थेवाईपणे विचारपूस करून किती शेती आहे, शेतीमध्ये काय पेरले, उत्पादन किती होईल, आदींबाबत माहिती जाणून घेतली.

बैठकीला संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी