शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रशिक्षण

 



यवतमाळ, दि. 23 : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेबाबत मतदान केंद्रावर उपस्थित राहणारा स्टाफ, मायक्रो ऑब्जर्व्हर, संबंधित झोनल अधिकारी यांचे मास्ट्रर ट्रेनरद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले.

नियोजन सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह, अमरावती येथील महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उपायुक्त श्री. लहाने, सहाय्यक आयुक्त (भुसूधार) श्याम मस्के, पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जान्सन, जिल्ह्याचे अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, तिवसा येथील उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहन कनिचे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, निवडणुकीत दिव्यांग मतदारांची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी रॅम्प तसेच निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व सुविधा मतदार केंद्रावर असणे गरजेचे आहे. ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्र संपूर्णपणे सॅनिटाईझ असणे आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रावर कार्यरत अधिकारी आणि मतदानाचा हक्क बजावणा-यांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. मतदान केंद्रात एका वेळी एकच मतदार राहील, याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी विशेष दक्षता घ्यावी, आदी सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

मतदान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी केंद्रापर्यंत जाण्यायेण्याचा रस्ता, पथकातील सदस्यांचे मोबाईल क्रमांक, आपल्या मतदान केंद्राचे चिन्ह जाणून घ्यावे. तसेच मतदानासाठी लागणारे साहित्य जसेच लाख कांडी, कापडी पिशवी, लोखंडी पट्टी, फॉर्म 19, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची नमुना स्वाक्षरी, जांभळ्या शाईचा विशेष पेन आदी साहित्य काळजीपूर्वक केंद्रावर नेणे आवश्यक आहे. यावेळी मास्टर ट्रेनर श्याम मस्के आणि नरेंद्र फुलझेले यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरीता जिल्ह्यात एकूण 19 मतदान केंद्र असून निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत शिक्षक मतदार 7407 आहे. यात पुरुष शिक्षक मतदार 5614 तर महिला शिक्षक मतदार 1793 आहे.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी