अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक कोव्हीड संदर्भात सुचना लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवा - जिल्हाधिकारी श्री. सिंह

 




यवतमाळ, दि. 7 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने दिलेल्या कोव्हीड संदर्भातील सुचना लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कानिचे, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगिता राठोड आदी उपस्थित होते.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरीता जिल्ह्यात एकूण 19 मतदान केंद्र राहणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक मतदान केंद्र संपूर्णपणे सॅनिटाईझ करणे, कार्यरत अधिकारी तसेच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणा-यांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मतदानाचे व मतमोजणीचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण 21 आणि 30 नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणा-यांचे प्रशिक्षण 26 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी होणार आहे. सदर प्रशिक्षणावेळी सर्वांची ॲन्टीजन टेस्ट केली जाईल.

मतदान केंद्रावर किमान आवश्यक सोयीसुविधा ठेवण्यासाठी सर्वांनी नियोजन करावे. तसेच पॉझेटिव्ह असलेल्या व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत शिक्षक मतदार 7407 आहे. यात पुरुष शिक्षक मतदार 5614 तर महिला शिक्षक मतदार 1793 आहे.

बैठकीला तहसीलदार कुणाल झाल्टे, आनंद देऊळगावकर यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी