जिल्ह्यातील 102 आयटीआय उमेदवारांची सुझुकी मोटर कंपनीत निवड

 

                                                                  

Ø आयटीआयच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे फलित

यवतमाळ, दि. 20 : लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-यांवर संक्रात आली असतांनाच येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) मात्र ऐन दिवाळीत तरुणांच्या जीवनात प्रकाश उजळविला आहे. आयटीआयच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल 102 उत्तीर्ण उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. गुजरातच्या हसनपूर येथील सुझुकी मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन बसेसने ही मुले कंपनीकडे रवाना झाली.

निवड झालेल्या मुलांना निरोप देण्यासाठी आयटीआयतर्फे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेमंड युको डेनिम प्रा. लि.चे वर्क्स डायरेक्टर नितीनकुमार श्रीवास्तव तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम, आयटीआयच्या प्राचार्या कविता बुटले आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही फार मोठी उपलब्धी व दिवाळी भेट असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथींच्या हस्ते आयटीआयच्या परिसरात बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यावर बस गुजरातकडे रवाना झाली. विशेष म्हणजे नोकरीसाठी निवड झालेल्या 102 उमेदवारांच्या पहिल्या टप्पातील प्रवासासाठी कंपनीतर्फे दोन बसेसची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.

तत्पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व उमेदवारांचे हात तसेच बसेस सँनिटाईज करण्यात आल्या. याशिवाय प्रत्येक उमेदवारांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमीटरने तपासणी करण्यात आली. आयटीआयतर्फे सर्व उमेदवारांना प्रत्येकी दोन मास्क व जेवणासाठी पार्सल बॉक्स पुरविण्यात आले.

याप्रसंगी आयटीआयचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रमोद भंडारे, दारव्हा आयटीआयचे प्राचार्य  रमेश राठोड, आर्णीचे प्राचार्य वसंत भगत, घाटंजीचे प्राचार्य प्रविण गुल्हाणे, सेवानिवृत्त प्राचार्य राजेद्र लाडखेडकर यांच्यासह प्रशिक्षण सल्लागार अपर्णा आगरकर, पी.डी. डोंगरे, एस.ए. काटपल्लीवार, जे.एस. वानखडे, एस.ए. पांडे आदी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी