जिल्हाधिका-यांनी घेतला नोडल अधिका-यांचा आढावा



 अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

यवतमाळ, दि. 28 : येत्या 1 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या  बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तहसीलदार सुभाष जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 19 मतदान केंद्र आहे. या सर्व मतदान केंद्रांना दोन दिवसात भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी करावी. 30 नोव्हेंबरपर्यंत मतदान प्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य मतदान केंद्रावर पोहचवावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही निवडणूक होणार असल्यामुळे मतदान केंद्रावर थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, पीपीई किट, प्रथमोपचार साहित्य आदींचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने पुरवठा करावा. येत्या दोन दिवसांत आपण स्वत:ही जिल्ह्यातील मतदान केंद्रांना भेटी देणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघानाच्या काही तक्रारी प्राप्त आहेत का, याचाही आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला.

 

असे करावे मतदान : मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या केवळ जांभळ्या शाईच्याच स्केचपेनने मतदारांनी मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सील, बॉलपेनचा वापर करू नये. पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील 'पसंतीक्रम नोंदवावा'. या रकान्यात '1' हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या लक्षात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम (उदा. 2,3,4) मतदार मतपत्रिकेवर नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमदेवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकांमध्येच नोंदवावे. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येऊ नये. पसंतीक्रम नोंदवितांना वापरायचे अंक हे भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे इंग्रजीमध्ये व मराठी भाषेतील देवनागरीमध्ये 1,2,3 किंवा रोमन अंक स्वरुपात नोंदवावे. मतदारांनी मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव, किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवितांना 'टीकमार्क' किंवा 'क्रॉसमार्क' अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरीता मतदारांनी पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी