पैनगंगा अभयारण्यातील 21 गावांच्या मुलभूत सोयीसुविधेबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा



यवतमाळ, दि. 5 : उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या 21 गावांतील रस्ते, पाणी, वीज, टॉवर, शाळा, दवाखाने आदी मूलभूत सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला.

बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, जिल्हा शल्य ‍चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तहसीलदार आनंद देऊळगावकर, पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, पैनगंगा अभयारण्य संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबुसिंग जाधव आदी उपस्थित होते.

अभयारण्यातील गावात पक्के रस्ते, वनहक्क दावे, भोगवटादार दोन जमिनीचे एक मध्ये रुपांतर, आरोग्याच्या सुविधा, स्थानिकांना रोजगाराची उपलब्धता, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतमालाचे नुकसान आदी मागण्यांबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, अभयारण्यात असलेल्या 21 गावातील सा.बा. विभागांतर्गत येणा-या रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जि.प.बांधकाम अंतर्गत येणारे जवळपास 60 ते 70 किमीच्या रस्त्यांसाठीसुध्दा त्वरीत निर्णय घेण्यात येईल. भोगवटादार 2 ची जमीन भोगवटादार 1 मध्ये करण्यासंदर्भात महाराजस्व अभियानांतर्गत कार्यवाही करता येते. याबाबत संबंधित गावांच्या तलाठ्यांची बैठक घेऊन संपूर्ण रेकॉर्ड तयार ठेवा, अशा सुचना त्यांनी तहसीलदारांना केल्या.

वनहक्के दावे निकाली काढण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यातच राबवायची असून या 21 गावांतील दावेसुध्दा प्राधान्याने निकाली काढावे. आरोग्य यंत्रणेंगतर्गत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. वन्यप्राण्यांकडून होणारे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी    शेतक-यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तसेच वन विभागाने कुंपन देण्यासंदर्भात नियोजन करावे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता नरेगाअंतर्गत कामे सुरू करून रोजगार द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत किमान पाच कामे सुरू होणे गरजचे आहे. त्यानुसार अभयारण्यातील 21 गावांमध्ये किमान 100 च्या वर कामे त्वरीत सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी