सोमवार ते शनिवार दुकानांच्या वेळा सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत

 


Ø जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधारीत निर्देश

यवतमाळ, दि. 01 : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित यवतमाळ जिल्ह्यात खालीप्रमाणे सुधारीत निर्देश दिले आहे. सदर आदेश दिनांक 8 मार्च 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात येत असून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना ह्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एन.वाय.के. बँका सेवा वगळून) ह्या 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना ह्या एकूण 15 टक्के किंवा कमीतकमी 15 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील.

ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना (वधू व वरासह) तहसिलदार/मुख्याधिकारी यांचेकडून परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानीक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.

मालवाहतुक ही नेहमी प्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी (उदा.ॲटो) मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बसवाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सोशल डिस्टन्सींग व निर्जंतुकीकरण करून वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे.

सर्व धार्मिकस्थळे ही एकावेळी 10 व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरीकांसाठी सुरु राहतील. ठोक भाजीमंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणीक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसम्मेलन हे या कालावधीत बंद राहतील.

सकाळी 7 वाजेपावेतो मॉर्निंगवॉक व व्यायामास सुट राहील. दुग्ध विक्रेते/ डेअरी यांची दुकाने ही सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सुरु राहतील. यापूढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शनिवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवडा अखेर शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. सदर संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच औषधी दुकानासह), पेट्रोल पंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी