जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

 


Ø नवरदेवासह इतर मंडळीवर गुन्हा दाखल

यवतमाळ, दि. 19 :  पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन हद्दीतील दुर्गम भागात वसलेल्या पांढुर्णा (बु) येथे केदारालिंगी मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न समारंभ संपन्न होत असल्याची माहिती खंडाळा पोलिस स्टेशनला मिळाली. प्रत्यक्ष भेट दिली असता वेगळाच प्रकार पोलिस प्रशासनाच्या लक्षात आला. हिंगोली पोलिस व जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली यांची टिम तेथे होती. त्यांनी शहानिशा केली असता त्याआधारे सदर नववधू ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ पोलिस प्रशासनाने अल्पवयीन बालिकेला व वऱ्हाडी मंडळीला ताब्यात घेतले.

कोरोनासंदर्भातील शासनाचे नियम धाब्यावर बसवून हिंगोली जिल्ह्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पांढूर्णा (बु.) येथील 30 वर्षीय मुलासोबत लग्न होणार असल्याची माहिती मिळताच ग्रामसेवक व बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पांडुरंग बुरकुले यांनी याविषयीची तक्रार खंडाळा पोलिस स्टेशनला दाखल केली. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 च्या कलम 9, 10, 11 व कोरोना काळात गर्दी जमविल्याबाबत विविध कायद्यांतर्गत नवरदेव, लग्न जुळवणारे व वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन बालिकेला तेव्हाच ताब्यात घेवून जिल्हा बाल संरक्षक कक्ष यवतमाळद्वारे बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात तसेच खंडाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल चावडीकर, पोलिस उपनिरिक्षक रवींद्र मस्कर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच या कारवाईस हिंगोली येथील पोलीस उपनिरिक्षक एस.एस. घेवरे व हिंगोलीच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी गणेश मोरे, रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, हिंगोली चाईल्ड लाईन तसेच यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण कक्षचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनील बोक्से, वनिता शिरफुले, शिरिष इगवे यांचे सहकार्य लाभले.

बाल विवाह ही एक गंभसीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखलील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये 2 वर्ष कारावास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे बालविवाहबाबत नागरिकांनी अतिदक्ष रहावे. तसेच बाल विवाहबाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ 8888460260 यावर अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी