कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाचे टीमवर्क उत्तम




 


Ø केंद्रीय पथकाच्या सदस्याची यवतमाळ येथे भेट

Ø प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे, त्याची कारणे जाणून घेण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्रीय पथकाच्या सदस्याने यवतमाळला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतल्यानंतर शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून सुचना केल्या.

केंद्रीय पथकाचे डॉ. आशिष रंजन हे सोमवारी यवतमाळात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत त्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन होणे अत्यावश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असून कोरोनाला रोखण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे सर्वांची जबाबदारी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर (2.7 टक्के) कमी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक असून, सामाजिक अंतराचे पालन करावे. गर्दी टाळावी, आदी सुचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला भेट देऊन त्यांनी कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यानंतर शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शिरे ले-आऊट येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, न.प.मुख्याधिकारी सुनील बल्लाळ आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी