अविनाश चव्हाण व त्याचे टोळीवर मकोका (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई

 


Ø अवैध रेती तस्करी हल्ला प्रकरण

यवतमाळ, दि. 2 : उमरखेड येथील कुख्यात गुंड अविनाश प्रकाश चव्हाण व त्याच्या साथीदाराने नायब तहसीलदार व तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदाराने अवैध रेती प्रकरणी 23 जानेवारी 2021 रोजी उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार व त्यांचे पथकावर चाकुने हल्ला केला होता. याप्रकरणी उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये 24 जानेवारी रोजी अविनाश चव्हाण व त्याचे साथीदारांविरूध्द कलम 307, 397, 395, 353, 332 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख अविनाश चव्हाण व त्याचे इतर साथीदारांचा शोध घेण्याकरीता वेगवेगळी पथके तयार करून त्यांचे अटकसत्र राबविण्यात आले. आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदारांविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, खुनासह दरोडा, गंभीर जखमी करून दरोडा, अग्नीशास्त्राचा वापर करून दरोडा, खंडणी, घरफोडी, चोरी, दंगा, सरकारी नौकरांवर हमला, महिलांवर अत्याचार, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्याच्या विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (एमसीओसीए) अन्वये कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला पोलिस उपमहानिरिक्षकांनी मंजूरी दिली असून सदर गुन्ह्यात एमसीओसीए लावण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंढे करीत आहेत.

जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होणे आवश्यक असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द प्रचलित कायद्यांनुसार एमसीओसीए, एमपीडीए, हद्दपार अशा कठोर कारवाया करण्यात येणार आहे. मकोका अंतर्गत उमरखेड उपविभागातून ही पहिली कार्यवाही झाली आहे. यापूढे जिल्ह्यातील इतर उपविभागातसुध्दा अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगार व अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या व्यक्ती / टोळीवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच जनतेनेही अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या व्यक्ती, टोळ्या बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिका-यांना द्यावी, असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी