टेस्टिंग व लसीकरणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे



 


Ø सामाजिक संघटनांसोबत बैठक

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासोबतच आता टेस्टिंग आणि लसीकरण याला सुध्दा प्राधान्य देण्यात आले असून यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

आयसोलेशन, टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण आदी कामे प्रशासनाकडून करीत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी पडत असल्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी यासाठी प्रशासनासोबत काम करून जनजागृती करणे आवश्यक आहे. कोव्हीडवर नियंत्रण तसेच मृत्युदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वाढता मृत्युदर ही अतिशय गंभीर बाब असून नागरिकांच्या सतत संपर्कात येणारे व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक यांनी टेस्टिंगसाठी समोर यावे. तसेच 45 वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून यवतमाळ शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी आपापल्या भागातील 45 वर्षांवरील नागरिकांना सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वत: घेऊन यावे.

पुढील 15 ते 20 दिवसांत शहरातील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. टेस्टिंग तसेच लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठीसुध्दा विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. आपल्या संपर्कात येणा-या सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांना लसीकरणाबाबत माहिती द्या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी सावित्रीबाई समाजकार्य विद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शंतनु शेटे, प्रयास संघटनेचे प्रशांत बनगिरवार, मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टीसचे राशिद अनवर, गायित्री परीवारचे गोविंद शर्मा, सावकलार सामाजिक संस्थेचे अजय बिहाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे श्रीकांत लोडम, प्रकाश चहाकर, नारी रक्षा समितीचे सुकांत वंजारी, विनोद दोंदल यांच्यासह अनिल गायकवाड, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी