बाभुळगाव तालुक्यातील वाटखेड (बू.) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

 


यवतमाळ, दि. 17 : बाभुळगाव तालुक्यातील मौजा वाटखेड बू. येथील कोरोना रुग्ण वाढीचा वेग व संख्या लक्षात घेता वाटखेड हे संपूर्ण गाव पुढील 15 दिवसांकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे.

बाभुळगाव येथील कोविड – 19 सेंटर, क्षमता लक्षात घेता वाटखेड येथील रुग्णांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले रुग्ण नजर चुकवून गावामध्ये इतर कोणत्याही कामाकरीता जाणे – येणे करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविड- 19 चा प्रसार व प्रभाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सदर बाबी विचारात घेता मौजा वाटखेड बू. येथील कोविड – 19 ची रुग्ण संख्या मर्यादित ठेवणे व गावातील संसर्ग संपविण्याचे दृष्टीने संपूर्ण गाव पुढील 15 दिवसाकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार मौजा वाटखेड बू. हे संपूर्ण गाव 15 दिवसाकरीता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वरील नमुद क्षेत्रात प्रतिबंधित आराखड्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी देण्यासंबंधाने संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी, बाभुळगाव व सचिव, ग्रामपंचायत वाटखेड बू. यांनी कार्यवाही करावी.

सदर मनाई हुकुम आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच गटविकास अधिकारी, पं.स. बाभुळगाव यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित कराव्यत आणि सदर्हु परवाना, पासेस धारकांची यादी संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी यांना नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी, पं.स. बाभुळगाव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांच्या मार्फत करावी.

वरील आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंडा संहिता 1860  चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

 

आर्णि तालुक्यातील गणगाव येथील काही भाग प्रतिबंधित घोषित : आर्णी तालुक्यातील मौजा गणगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सदर रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील मौजा गणगांव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी