मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण आणि टेस्टिंगवर लक्ष केंद्रीत करा

 



Ø जिल्हाधिका-यांनी घेतला तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मृत्युचे सरासरी वय 60 वर्षांच्या वर आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करून टेस्टींगवरसुध्दा लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 93 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, लसीकरणाची गती अतिशय संथ आहे. प्रत्येक केंद्राला रोज किमान 100 याप्रमाणे 9300 जणांना लस देणे अपेक्षित आहे. सध्यास्थितीत लसीकरणाचा आकडा केवळ 2600 ते 2700 आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवा. फ्रंट लाईन वर्कर्स चे केवळ 70 ते 75 टक्केच लसीकरण झाले आहे.

            कोरोना पॉझेटिव्ह असलेल्या प्रत्येक रुग्णामागे किमान 20 ते 25 काँटॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक असतांना यात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच गृह विलगीकरणात केवळ 10 ते 15 टक्केच नागरिकांना ठेवण्याच्या भारत सरकारच्या सुचना आहेत. इतरांना कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर आणि विलगीकरण कक्षात ठेवावे. गृह विलगीकरणात असणारे नागरिक शासनाच्या सुचनांचे पालन करीत नाही, असे निदर्शनास आले आहे. रॅपीड ॲन्टीजन किट कोणत्या तालुक्यात किती शिल्लक आहेत. तसेच उपयोगात आणलेल्या किटबाबत अजूनही डाटा भरण्यात आला नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी लक्ष देऊन अहवाल सादर करावा.

प्रत्येक तालुक्याने काँटॅक्ट ट्रेसिंगचा डाटा काळजीपूर्वक भरावा. तालुक्याला जे उद्दिष्ट दिले आहे, ते कोणत्याही परिस्थतीत पूर्ण करणे तालुकास्तरीय यंत्रणेची जबाबदारी आहे. यात हयगय होऊ देऊ नका. गत दहा दिवसांत जिल्ह्यात रोज किमान पाच हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ही चांगली बाब असून हेच प्रमाण पुढील काही दिवस कायम ठेवा. जेणकरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, प्रत्येकाची चाचणी करणे आवश्यक आहे. सारीचे रुग्ण कमी करणे आणि हाय रिस्क ट्रेसिंग वाढविणे, याला प्राधान्य द्या. लसीकरणासंदर्भात तालुकास्तरीय टास्क फोर्सच्या अद्यापही मिटींग झाली नाही. ती त्वरीत घ्यावी. 45 ते 60 वयोगटातील को-मॉरबिड लोकांचा शोध घ्या. तसेच 60 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

बैठकीला संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी