टेस्टिंग आणि लसीकरणासाठी नागरीकांनी समोर यावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे

 


* कोविड संदर्भात जिल्हास्तरीय आढावा

यवतमाळ  दि. 30 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात प्रामुख्याने यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, केळापूर, वणी व इतर मोठ्या शहरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरीकांनी टेस्टिंग व लसीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे नागरीकांनी यासाठी स्वत:हून समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यात तसेच शहरात टेस्टिंगची संख्या व लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, 45 वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या नागरीकांनी लसीकरणासाठी स्वत:हून समोर यावे. निवृत्ती वेतनधारक तसेच विविध शासकीय योजनांचे अनुदान घेणारे 45 वर्षांवरील लाभार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटूंबियांनी लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. याबाबत संबंधीत नगरपालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार, आरोग्य यंत्रणा तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सोईसुविधा तयार करून द्याव्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्यात वाढता मृत्यूदर चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी उपचार पध्दतीची मानक प्रणाली व्यवस्थित राबविण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले. ऑक्सिजनचा पुरवठा विनाअडथळा सर्वत्र सुरळीत सुरु राहील, यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्न व औषध प्रशासन यांनी गांर्भियाने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये आयएलआय, सारीच्या तपासण्या वाढविणे तसेच लसीकरणासाठी नागरीकांना प्रवृत्त करणे आदींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेला निर्देश दिले.

0000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी