प्रत्येक बालकाने जंतनाशकाची गोळी घ्यावी
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिन
*सर्व शाळेत एंल्बेंडेझॉल देणार
*गोळ्या संपूर्ण सुरक्षित, प्रमाणित
यवतमाळ, दि. 2 : एक ते चौदा वर्षे वयोगटातील 68 टक्के बालकांमध्ये आतड्यांचा कृमी दोष आढळतो, जंतांचा नाश करून सदृढ आरोग्यासाठी बालकांना 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या गोळ्या संपुर्णत: सुरक्षित आणि प्रमाणित आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकाने जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळा आणि अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या जंतनाशक गोळी उपक्रम राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्र. ह. राऊत, शासकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजिस्ट श्रीमती इगवे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, बालकांच्या आतड्यामध्ये कृमी दोष आढल्यामुळे ते आजाराला बळी पडतात. बालकांचे आरोग्य, पोषण स्थिती, शिक्षणाची संधी आणि जीवनमान उंचावण्यासाठी 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी जंतनाशकाचा उपक्रम राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येतो. या एंल्बेंडेझॉल गोळ्यांमुळे रक्तक्षय कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. बालकांची आकलनशक्ती सुधारून शाळेत क्रियाशील होतात. यासाठी शाळा आणि अंगणवाडीच्या माध्यमातून जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. शाळांमध्ये मध्यान्न भोजनानंतर या गोळ्या देण्यात याव्यात. अंगणवाडी केंद्रात दाखल झाले नसलेल्या बालकांनाही नजीकच्या अंगणवाडी केंद्रातून गोळ्या देण्यात येतील. जंतनाशक दिनी गोळी दिलेली नसल्यास त्यांना 15 फेब्रुवारी रोजी गोळी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण 7 लाख 80 हजार 343 गोळ्या 1 ते 19 वयोगटातील बालकांना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळा, शिक्षक, नर्सेस, आशा, अंगणवाडी सेविका, आशा सुपरवाझर, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट आदींची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात पर्यात्प संख्येत गोळ्या उपलब्ध आहेत. एकाचवेळी या गोळ्या देण्यात येणार असल्यामुळे सात लाख गोळ्या मोहिमेसाठी उपलब्ध होतील. एंल्बेंडेझॉल या जंतनाशक गोळ्या सुरक्षित आाणि प्रमाणित केलेल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या सेवनास त्या योग्य असल्यामुळे बालकांना थोडी मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटल्यास घाबरण्याचे कारण नाही. यासाठी गोळ्या देणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बालकांना सुरक्षित आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी जंतनाशक मोहिम चांगल्या पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. यात पालकांनीही 10 फेब्रुवारी रोजी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून जंतनाशकाच्या गोळीचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000



केबल ऑपरेटर निवडीसाठी शनिवारी अमरावतीमध्ये सोडत
यवतमाळ, दि. 2 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड शनिवारी, दि. 4 फेब्रुवारी रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार आहे. सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
शिष्यवृत्तीसाठी आधारकार्ड लिंक करावेत
यवतमाळ, दि. 2 : मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी आणि परीक्षा फी प्रदान करण्यासाइी आधारकार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आधारकार्ड लिंक केल्याशिवाय त्यांना शिष्यवृत्ती योजनेचे लाभ मिळणार नाही. या लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड लिंक झाले किंवा नाही याबाबतची खात्री महाविद्यालयांनी resident.uidai.in या संकेतस्थळावरून करावी. आधारकार्ड लिंक झाल्याची खात्री केल्यावरच अर्ज समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी