पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान पथक रवाना
*55 गट, 110 गणांसाठी आज मतदान
*जिप, पंस साठी 928 उमेदवार रिंगणात
*मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती
यवतमाळ, दि. 15 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यात पहिल्या टप्प्यात 55 गट आणि 110 गणासाठी शुक्रवारी, दि. 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी आज मतदान पथक संबंधित गावी रवाना झाले आहे. यावर्षी प्रथमच उमेदवारांनी शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीतून उमेदवारांची संपत्ती आणि दाखल गुन्ह्यांची माहिती फलकाद्वारे लावण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीसाठी यात मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 55 गटात 319 उमेदवार आहेत, तर पंचायत समितीसाठी 609 असे एकूण 928 उमेदवार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या क्षेत्रासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. दिव्यांग आणि वृद्धांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानोत्तर आणि जनमत चाचणीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत याचे निकाल जाहिर करता येणार नाही.
यावेळी निवडणूक आयोगाने नव्याने काही नियम लागू केले आहे. यात उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. यात संपत्तीच्या माहितीसोबतच संबंधित उमेदवारांवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहे, याचीही माहिती फलकाद्वारे देण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक संपल्यापासून 30 दिवसांच्या आत तर पक्षांना 60 दिवसांच्या आत निवडणूक खर्च यंत्रणेस कळवावा लागणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
00000
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी
आठवडी बाजार बंद ठेवण्यासाठी परवानगी
यवतमाळ, दि. 15 : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवारी, दि. 21 फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्याची परवानगी पणन संचालनालयाने दिली आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कुंभा मार्डी, ता. मारेगाव, घोन्सा कायर, ता. वणी, वटफळी ता. नेर, लाडखेड, ता. दारव्हा, देऊरवाडी, ता. आर्णी, विडूळ, ता. उमरखेड या सहा गट आणि 12 गणांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरत असल्यास ते बंद ठेवण्यास पणन संचालनालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या दिवशी भरविण्यात येणारे आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्याची मूभा दिली आहे.
राळेगाव, मारेगाव बाजार समितीचे काम बंद राहणार
            जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी, दि. 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राळेगाव आणि मारेगाव येथील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये होणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाम बंद ठेवण्याची परवागनी पणन संचालनालयाने दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
00000
आदिवासी विकास मंडळातर्फे तूर खरेदी
यवतमाळ, दि. 15 : आदिवासी उपयोजना क्षेत्रात राष्ट्रीय कृषि विपणन महासंघ (नाफेड) साठी तूर खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळास अभिकर्ता म्हणून नेमण्यात आले आहे.
यासाठी प्रादेशिक कार्यालय, यवतमाळ अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय, कळंबचे खरेदी केंद्र म्हणून लोहारा येथे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणावा. विक्रीसाठी माल आणताना शेतकऱ्यांकडून अद्ययावत नमूद पिकपेरा असलेला सातबारा तसेच पिकपेरा नमूद नसल्यास तलाठ्याचे पेराप्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुरीचा दर हा प्रतिक्विंटल पाच हजार 50 रूपये एफएक्यू मालासाठी ठेवला आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती देणे आवश्यक आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
केरोसिनचे फेब्रुवारी महिन्यासाठी नियतन मंजूर
यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यांचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. घाऊक, अर्धघाऊक परवानाधरकांना उचल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 960 केएल केरोसिनचा यात समावेश आहे. यापैकी 594 केएल केरोसिनचे वितरण द्वार प्रणाली अंतर्गत करण्यात येणार आहे.
नियतनाबाबत सर्व तहसिलदारांना कळविण्यात आले असून शिधापत्रिकाधारकांना त्यांना देय असलेल्या प्रमाणात वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार परवानाधारकांनी मुदतीत नियतनाची उचल करून त्याचे वाटप करावयाचे आहे. उचल उशिरा केल्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वाटप व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
केरोसिनचे वाटप आकारणी करण्यात आलेल्या दरातच करावयाची आहे. महिन्याच्या अखेरच्या तारखेस तालुकानिहाय वाटपाची यादी सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
 00000
क्रीडा प्रबोधनीच्या प्रवेशासाठी नैपुण्य चाचणी
यवतमाळ, दि. 15 : शिव छत्रपती क्रीडापिठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सन 2016-17 साठी नवीन प्रवेश देण्यासाठी तालुकास्तरावर नैपुण्य चाचणी घेण्यात येणार आहे.
शारिरीक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी तालुकास्तरावरून राज्यस्तरापर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन तालुकास्तरावर दि. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्याचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. 2 मार्च रोजी करण्यात आले आहे. अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी वैज्ञानिक तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षणावर आधारित भर देण्याची गरज आहे. या उद्देशाने राज्यातील खेळ परंपरा सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधनी सुरू करण्यात आली आहे. यात 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करून विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकाद्वारे दिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे या क्रीडा पिठाच्या उद्देशाच्या पुर्तीसाठी क्रीडा प्रबोधनीतर्फे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शिव छत्रपती क्रीडापिठ पुणे अंतर्गत सन 2016-17 साठी विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये नवीन प्रवेश देण्यासाठी राज्यातील 8 ते 14 वर्षे वयोगटातील शाळेत शिकत असलेल्या मुला-मुलींच्या वजन, उंची, 30 मीटर जोरात धावणे, 800 मीटर धावणे, 6 बाय 10 मीटर शटल रन, उभे राहून लांब उडी, उभे राहून उंच उडी, मेडीसीन बॉल थ्रो, लवचिकता या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच तालुका क्रीडा संयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.
00000
दररोज 20 वाहनांची योग्यता तपासणी
यवतमाळ, दि. 15 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सेवाप्रवेशोत्तर परिक्षेसाठी गेले असल्यामुळे 15 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत दररोज केवळ 20 वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी तपासणी करण्यात येणार आहे.
यवतमाळ येथील कार्यालयात दोन मोटार वाहन निरीक्षक आहेत. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी केवळ 20 वाहनांची या काळात तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे काया्रलयात आपल्या वाहनांची नोंदणी करून अपॉईटमेंट घेऊन दिवस व वेळ निश्चित करून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी