कृषि मालांचा अंदाज बाजारभाव जाहिर
यवतमाळ, दि. 8 : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाच्या माध्यमातून निवडक कृषि मालाचे पेरणीपूर्वी व काढणीदरम्यान बाजारभावाबाबतचे अंदाज जाहिर करण्यात आले आहे.
यानुसार 7 फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार सोयाबिन, तूर, मका, कांदा, टोमॅटो या पाच कृषि मालाबाबतचे जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीमधी बाजारभावाबाबतचे अंदाज जाहिर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रति क्विंटल तुरीचे दर 5 हजार 100 ते 5 हजार 400, सोयाबिन 3 हजार ते 3 हजार 300, मका 1 हजार 400 ते 1 हजार 550, कांदा 600 ते 800, टोमॅटो 400 ते 600 या दरम्यान राहतील. याबाबत कृषि मालाबाबत या पुढील सुधारीत अंदाज फेब्रुवारी महिन्यात वर्तविला जाणार आहे. या अंदाजांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील यांनी केले आहे.
00000
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गुरूवारपासून प्रवेश प्रक्रिया
यवतमाळ, दि. 8 : शिक्षण हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमानुसार 2017-18 या सत्रात दुर्बल आणि वंचित घटकासाठी 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी 193 शाळांची नोंदणी पुर्ण झाली आहे. पालकांना 9 ते 21 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी 9 ते 21 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन प्रवेश अर्ज student.maharashtra.gov.in/admportal/Users/rteindex या वेबसाईटवर सादर करावे लागणार आहे. यातील प्रवेशाची पहिली लॉटरी 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी 1 मार्च ते 9 मार्च, उर्वरीत रिक्त जागा दर्शविण्यासाठी 10 ते 11 मार्चचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या सोडतीमधील प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उर्वरीत विद्यार्थ्यांकरीता 14 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत चार सोडती काढण्यात येतील.
मागील वर्षी जिल्ह्यात 179 शाळांनी 1860 जागांसाठी नोंदणी केली होती. यात 880 जागांवर प्रवेश देण्यात आला. यावर्षी प्रवेशपात्र शाळांची संख्या वाढल्यामुळे प्रवेशपात्र जागांची संख्या वाढणार आहे. पात्र असूनही ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, तसेच सोडतीद्वारे निवड झाल्यानंतरही ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा नोंदणीनंतर पालकांना student.maharashtra.gov.in/admportal/Users/rteindex या वेबसाईटवर 21 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करताना गुगल मॅपिंगवरील घराचे स्थान निश्चित केल्यानंतर त्यांना एक ते तीन किलोमीटरवरील प्रवेशपात्र शाळांची यादी दिसेल. यातील एका किंवा सर्वच शाळांसाठी अर्ज करता येतील. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करताना पालकांनी मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. या क्रमांकावरच लॉटरीचा दिनांक, निवड झालेल्या शाळेचे नाव, प्रवेशाचा कालावधी आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर संगणक प्रणालीमार्फत शाळानिहाय सोडत काढून प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याची निवड एकापेक्षा अधिक शाळेसाठी झालेली असल्यास त्याला विहित मुदतीत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश घेतलेला नसल्या त्याला पुढच्या फेरीतून बाद करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश घेतलेली शाळा बदलवून मिळणार नाही.
यावर्षी ऑनलाईन अर्ज करताना कोणतेही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाचे नसून निवड झाल्यास प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळी कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. यात वंचित घटकासाठी पालकांचा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसिलदारांचा 2055-16 आणि 2016-17 चा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, बालकाचा जन्माचा दाखला, बालकाचा पासपोर्ट, असल्यास अपंगत्वाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. नर्सरी प्री केजी साठी एक हजार 98 जागा असून 30 सप्टेंबर 2017 रोजी 3 वर्षे वय पुर्ण आणि पहिलीसाठी 647 जागा असून प्रवेशासाठी पाच वर्षे 4 महिने वय पुर्ण होणे आवश्यक आहे.
यातील प्रवेशासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली असून प्रवेशपात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात प्रत्येक शाळेसाठी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सोळा पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात पालकांसाठी मदतकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
00000
मुख्य निवडणूक निरीक्षक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
यवतमाळ, दि. 8 : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे यांची जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमादरम्यान ते जिल्ह्याच्या विविध भागाचा दौरा करणार आहेत.
गुरूवारी, दि. 9 फेब्रुवारी रोजी यवतमाळ, मारेगाव, वणी, झरी जामणी, केळापूर येथे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आदर्श आचारसंहिता अंमलजबावणीबाबत तपासणी करतील. तसेच ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँगरूमची पाहणी करतील. 10 फेब्रुवारी रोजी केळापूर, यवतमाळ, बाभूळगाव, नेर, दारव्हा, दिग्रस येथे भेट देऊन पाहणी करतील. 11 फेब्रुवारी रोजी दिग्रस, महागाव, पुसद येथे मतदार केंद्रांना भेटी देतील. 14 फेब्रुवारी रोजी नेर, दारव्हा, यवतमाळ येथे तपासणी आणि मतदान केंद्रांना भेटी देतील. 15 फेब्रुवारी रोजी यवतमाळ, कळंब, राळेगाव, पांढरकवडा भेटी देऊन आदर्श आचारसंहितेबाबत तपासणी करतील. 16 फेब्रुवारी रोजी पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, यवतमाळ मतदान सुरू असताना मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील. 22 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील मतमोजणी केंद्रांना भेटी देतील. 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी दरम्यान उपस्थित राहतील.
00000
कृषि ग्रामीण विकास बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती
यवतमाळ, दि. 8 : यवतमाळ जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, यवतमाळ, नोंदणी क्रमांक 101 या बँकेवर जिल्हा उपनिबंधक यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती येथील विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी ही नियुक्ती केली आहे.
यवतमाळ जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, यवतमाळ, या बँकेचा अवसायक म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 105 तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 89 (4) नुसार बँकेविरूद्ध जिल्हा उपनिबंधक यांनी नोटीस जाहिर केली आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस यवतमाळ जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादीत यवतमाळ या बँकेविरूद्ध कोणत्याही संबंधाने किंवा कोणत्याही प्रकारचे दावे असल्यास अशा सर्व प्रकारचे दावे ही सूचना प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत संपूर्ण कागदपत्रांसह गौतम वर्धन, अवसायक, यवतमाळ जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादीत, यवतमाळ, टिळकवाडी, दाते कॉलेज रोड, यवतमाळ तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांच्याकडे विहित मुदतीत प्राप्त होतील, अशा बेताने पाठवावेत, विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दाव्यांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.
00000
जागतिक कर्करोग पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम
यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात जागतिक कर्करोग पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर्स स्पर्धा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 9 फेब्रुवारी रोजी कॅन्सर वॉरियर्सच्या मदतीने कोटपा अंमलबजावणी व दुष्परिणामाबाबत चर्चा करण्यासाठी पोलिस विभागासोबत बैठक घेण्यात येणार आहे. 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहायाने तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देऊन पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना तंबाखूमुळे होणारे कर्करोग व अन्य दुष्परिणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रवृत्त करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13, 14 आणि 16 फेब्रुवारी दरम्यान कॅन्सर वारीयर्स, दंत शल्य चिकित्सक आणि कान, नाक, घसा तज्ज्ञ यांच्या सहायाने मौखिक कर्करोग आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 14, 17, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रूग्णालय पुसद, पांढरकवडा, आणि ग्रामीण रूग्णालय, दिग्रस आणि वणी येथे गर्भाशय मुख आणि स्तन कॅन्सरची स्त्री रोग तज्ज्ञांकडून मोफत तपासणी शिबीर आयोजित करून करण्यात येणार आहे.
पोस्टर्स आणि निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धा शालेयस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. यातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची नावे मुख्याध्यापकांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय यांच्याकडे पाठवावी लागणार आहे. तसेच परिपाठाच्या वेळी दररोज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यास सांगण्यात येणार आहे. कर्करोग पंधरवाड्यामध्ये आयोजित कार्यक्रमांचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले आहे.
00000
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार संपर्क अधिकारी
यवतमाळ, दि. 8 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आणि चार संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे (मोबाईल क्रमांक 9769010906) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून यवतमाळ, आर्णी, घाटंजी, राळेगाव तालुक्यांसाठी अपर जिल्हाधिकारी एल. बी. राऊत, पुसद महागाव, उमरखेड, दिग्रस तालुक्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, नेर, दारव्हा, बाभूळगाव, कळंब तालुक्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, वणी, मारेगाव झरीजामणी, केळापूर तालुक्यासाठी अमरावती येथील समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी