आचारसंहिता कक्ष 24 तास सुरू
यवतमाळ, दि. 13 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण 55 गट आणि 110 गणासाठी 16 फेब्रुवारी, तर दुसऱ्या टप्प्यात 6 गट आणि 12 गणासाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक कार्याल्यात आचारसंहिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07232-240720 आणि टोल फ्री क्रमांक 1077 सर्व नागरीकांसाठी उपलब्ध आहे. निवडणुकीबाबत नागरीकांच्या सुचना, तक्रारी असल्यास त्यांनी या दूरध्वनी आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूवर कारवाई
यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्‍क विभागाने अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे.
जिल्ह्यात 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. यात अवैध देशी, विदेशी दारू विक्री, वाहतूक आणि हातभट्टी दारू विक्री धंद्यावर कारवाई करण्यात आली. निवडणूक काळात दारूचा वापर वाढणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी या निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक पराग नवलकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत 50 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात 27 आरोपींना अटक करण्यता आली असून दोन लाख 59 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच विशेष मोहिमेत 4 हजार 745 लिटर मोहाफुल सडवा नष्ट करण्यात आला आहे. यात 123 लिटर हातभट्टी, 80 लिटर देशी दारू, 19 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
भारी, करडोह, वाघापूर, गोदनी, लोहारा, डेहणी, माणिकवाडा, किन्ही, कृष्णनगर, काळी दौ., हुडी, मधुकरनगर, मोहदा, राळेगाव, रावेरी रोड, सिंघला, झरीजामणी, वणी, वरोरा रोड वणी आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मुळावा, ता. उमरखेड येथील सीएल-3 अनुज्ञप्तीमधून सरासरी मद्य विक्री पेक्षा जादा मद्यविक्री केल्याने या अनुज्ञप्तीधारकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई श्री. नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. बी. झाडे, यू. एन. शिरभाते, दुय्यम निरीक्षक के. जी. आखरे, के. एन. कुमरे, एस. एन. भटकर, ए. बी. पवार, व्ही. एस. वरठा, ए. वाय. खांदवे, अविनाश पेंदोर, एस. जी. घाटे, आर. एम. राठोड, जवान ए. ए. पठाण, एन. डी. दहेलकर, एम. रामटेके, महेश खोब्रागडे, एस. दुधे, पी. एच. राठोङ श्री. मसराम, राम पवार, श्री. मनवर, मनोज शेंडे, श्री. मेश्राम, श्री. साठे, श्री. भोंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
निवडणुकीच्या आधी दोन दिवस रात्रीचे विशेष गस्ती पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकातर्फे जिल्हाभरातून आलेल्या तक्रारींवर कारवाई होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपर्क क्रमांक जाहिर केले आहे. अवैध दारूच्या तक्रारीसाठी 8422001133 हा व्हॉटस्ॲप क्रमांक आणि 1800-833-3333 क्रमांक जाहिर करण्यात आला आहे. या क्रमांकावर तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी अवैध दारू, बनावट दारूची विक्री, भेसळ, अल्कोहोल, मळी, काळा गुळ आदींची माहिती द्यावी, परराज्यातून कर बुडवून दारूची बेकायदा वाहतूक होत असल्यास त्याचीही तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

कृषि विज्ञान केंद्रात माती परिक्षण, शेतकरी मेळावा
यवतमाळ, दि. 13 : येथील कृषि विज्ञान केंद्रात गुरूवारी, दि. 9 फेब्रुवारी रोजी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी फिरते माती परिक्षण केंद्रातफे्र माती परिक्षण करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे, आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील, डी. बी. काळे, विजय बारापात्रे आदी उपस्थित होते.
डॉ. इंगोले यांनी, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फिरते माती परिक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन उत्पादन वाढवावे. कृषि संवादिनीचे शेतकऱ्यांसाठी असलेले महत्त्व आणि शेतकऱ्यांना पिकाचे अधिक उत्पादन वाढीसाठी विद्यापिठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे सांगितले. डॉ. गाडे यांनी रब्बी पिकाचे उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय खताचे महत्त्व तसेच उन्हाळीपूर्व प्रमुख रब्बी पिकाचे एकात्मिक रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. ठाकरे यांनी माती परिक्षणाची माहिती दिली. तसेच प्रथम रेषिय पिक प्रात्यक्षिक तसेच पिक व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. श्री. पाटील यांनी आत्माच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच आत्मातर्फे आयोजित धान्य महोत्सव कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. नरेंद्रकुमार देशमुख यांनी शेतीपुरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. रिलायंस फाऊंडेशनच्या व्हाईस एसएमएस या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यातील उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. निलिमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मयूर ढोले यांनी आभार मानले.
00000

लोकअदालतीमध्ये 1363 खटले निकाली
यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी, दि. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1 हजार 363 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याचे तडजोड मुल्य 5 कोटी 2 लाख रूपये 56 हजार रूपये आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदिपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली. यास पक्षकारांचा चांगला प्रतिसाद लाभला. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच राष्ट्रीयकृत बँका यांची वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. ही प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदीपकुमार मोरे, जिल्हा न्यायाधीश ए. टी. वानखेडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन आगरकर यांनी पुढाकार घेतला.
संपूर्ण जिल्ह्यात लोक अदालतीमध्ये आपसी समझोत्याने निकाली काढण्यासाठी 1363 प्रकरणे विचारासाठी ठेवण्यात आली. यात मोटार अपघात नुकसान भरपाईचेी 40 प्रकरणे निकाली निघाली असून 1 कोटी 15 लाख 56 हजार रूपये, भूअर्जन मोबदल्याची 63 प्रकरणांची एक कोटी 20 लाख 73 हजार 159 रूपयांचे दावे निकाली काढण्यात आले. इतर प्रकरणांमध्ये बँकेचे वसुली दावे, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, चेक अनादरीत झाल्याची प्रकरणे, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आले. याचे तडजोडमुल्य 2 कोटी 66 लाख 26 हजार 884 रूपये आहे.
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर सचिन आगरकर, यवतमाळ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र धात्रक यांनी पुढाकार घेतला.
00000

विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्रमिकांचा सत्कार
यवतमाळ, दि. 13 : येथील गेडामनगरात श्री भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते श्रमिकांचा सत्कार करण्यात आला.
गेडामनगरात गेल्या 41 वर्षांपासून विश्वकर्मा सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येते. प्राचार्य डॉ. प्रकाश नंदूरकर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोज औदार्य, रामभाऊ लोखंडे, हिराभाऊ मिश्रा, संजय भुयार आदी उपस्थित होते.
यात मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण तसेच रक्तगट तपासणी करण्यात आली. शिबीराच्या अध्यक्षस्थानी पंकज  नानवाणी होते. या शिबीरात डॉ. केदार राठी, डॉ. प्रशांत चक्करवार, डॉ. चेतन दरणे, डॉ. शरद राखुंडे, डॉ. मोहमद, डॉ. अश्विन पाटील, डॉ. दिपक गुल्हाने यांनी रूग्णांची तपासणी केली. याचा परिसरातील नागरीकांनी लाभ घेतला. रात्री सप्त खंजेरीवादक पंकजपाल महाराज यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरीक, श्रमिक आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामभाऊ लोखंडे यांनी संस्काराचे महत्त्व सांगितले. तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक साधना काळे, नितीन बांगर यांचा सत्कार मनोज औदार्य आणि रामभाऊ लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
गुरूवारी, दि. 9 फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती दिनी अभिषेक हवन आणि पुर्णाहुती यज्ञ करण्यात आला. त्यानंतर हभप भगवान महाराज पापळकर यांचे काल्याचे किर्तन झाले. सायंकाळी महाआरतीने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी विनायक राखुंडे, रामराव शास्त्रकार, ज्ञानेश्वर राखुंडे यांनी पुढाकार घेतला.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी