कर्करोगाबद्दल समाजात धाक निर्माण व्हावा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये जागृती
*कर्करोगाबाबत जिल्ह्यात शिबीरे घेणार
*दंडात्मक कारवाई वाढविण्याचे आदेश
यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात अल्पवयामध्ये तंबाखूचे सेवन करण्याचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थी दशेतच तंबाखूच्या आहारी जात असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजात कर्करोगाचा धाक निर्माण होईल, अशी जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक कर्करोग पंधरवाड्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंजली दाभेरे, मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थावर विक्रीसाठी विविध प्रतिबंधात्क उपाययोजना करण्यात आल्या आहे. या पदार्थांचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे याबाबत कडक कारवाई होणे गरजेचे आहे. वारंवार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. तंबाखूमुक्त जिल्ह्यासाठी केवळ शाळांवर लक्ष केंद्रीत करून चालणार नाही, तर सर्व शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक कारवाई करावी. शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी नियोजनात्मक उपक्रम राबविण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
तंबाखूमुक्त जिल्ह्यासाठी मुलांवर लक्ष केंद्रीत करावे. प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी एका विद्यार्थ्याला तंबाखू आणि त्यामुळे होणारे आजार याबाबत माहिती देण्यास सांगण्यात यावे. याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होण्यास मदत होईल. जनजागृती होण्यासाठी प्रत्येक कार्यालयात माहितीचे पोस्टर लावण्यात यावे. पंधरवाडा राबविताना यात विविध विधायक कामे हाती घ्यावीत. कर्करोगाची अचूक माहिती देण्यासाठी डॉक्टरांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे. गेल्या काही दिवसात कर्करोग तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्करूग्ण आढळून आले असल्यामुळे जिल्ह्यातील कर्करोगाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात कर्करोग तपासणी शिबीर घेण्यात यावे, तसेच नागरीकांमध्ये धाक निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्याविरूद्ध दंडात्मक कारवाई हाती घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
00000

एकनाथ डगवार यांना गोविंदराव शिंदे पुरस्कार
यवतमाळ, दि. 7 : भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांना शांतीवन, पनवेत येथील कुष्ठरोग निवारण समितीतर्फे कै. गोविंदराव शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार 2017 देण्यात आला. न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान ग्रामदान कार्यामध्ये सर्वेक्षण, नियोजनाचे कार्याबरोबरच पुष्टी करणाचे कार्य केले. याबाबत हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पनवेल येथील कार्यक्रमावेळी मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा लेखामेंढा आदी उपस्थित होते.
00000
आठवडी बाजार बंद ठेवण्यासाठी परवानगी
यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतदानाच्या दिवशी गुरूवारी, दि. 16 फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्याची परवानगी पणन संचालनालयाने दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या दिवशी भरविण्यात येणारे आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्याची मूभा दिली आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी