निवडणुकीमध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
यवतमाळ, दि. 1 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गावपातळीवर होत आहेत, तसेच जिल्ह्यात महत्त्वाचे चार पक्ष निवडणूक रिंगणात आहे, त्यामुळे निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. ते मंगळवारी, दि. 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवडणूक संपर्क अधिकारी आदी उपस्थित होते. सुरवातीला जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा घेतला. तसेच संपर्क अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. सध्यातरी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात कोणतीही अडचण जाणवत नाही. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे. निवडणूक शांतता आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी विविध पथके निर्माण करण्यात आली आहे. कोणत्याही पक्ष किंवा गटाचा दबाव येणार नाही, अशा प्रकारे सर्व अधिकारी यांनी कार्य करणे अपेक्षित आहे. निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गावपातळीवर लढविल्या जातात. जिल्ह्यात सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होणार आहे. जिल्ह्यात कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास विविध यंत्रणेतील समन्वय चांगल्या पद्धतीने झाल्यास या निवडणुक चांगल्या प्रकारे पार पडतील. काही नागरीकांकडून कायदे, नियम तोडण्याची शक्यता असल्यास संबंधित व्यक्तीला आधीच नोटीस देण्यात यावी. संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी त्यांचा आराखडा द्यावा, त्यानुसार कार्यपद्धती अवलंबवावी. निवडणूक काळात शासकीय यंत्रणेला अंमलबजावणीचे अधिकार दिलेले आहेत. भरारी पथक, चेक पोस्ट आदींच्या माध्यमातून अनधिकृत प्रकारांना आळा घालता येऊ शकते, त्या दृष्टीकोनातून यंत्रणेने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
00000
पदवीधर मतदानासाठी मद्य विक्रीस बंदी
          यवतमाळ दि. 1 : जिल्ह्यात अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 3 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. 
            मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949चे कलम 142 (1) नुसार जिल्हाधिकारी यांनी बंदीचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार एफएल-2, सीएल/एफएल/टिडी-3, एफएल/बीआर-2, एफएल-3, सीएल-3, ताडी/टड-1 या सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
पदवीधरच्या मतदानासाठी 13 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ जिल्ह्यात अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 3 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त 13 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे.
मतदारांना पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करतेवळी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, पदवी, पदविका प्रमाणपत्र, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक क्षेत्र यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोटोसह दिलेले ओळखपत्र, बँक, 31 डिसेंबर 2016 पुर्वी पोस्टाने दिलेले फोटोसह खाते उघडलेले पासबुक, मालमत्तेसंबंधी पट्टे, रजीस्टर खरेदी केलेली फोटोसह कागदपत्रे, फोटोसह शिधापत्रिका, फोटोसह दिलेले अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र, फोटोसह शस्त्राचा परवाना, फोटोसह अपंगाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शासकीय संस्थांनी दिलेले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये दिलेले स्मार्ट कार्ड ओळखपत्र म्हणून सादर करावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
पदवीधरसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही सुट्टी
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ जिल्ह्यात अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या सर्व मतदार कर्मचाऱ्यांना एक दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मिळणार आहे.
ही विशेष नैमित्तीक रजा बीएसएनएल, रेल्वे, इन्शुरंस कंपनी, आयकर, डाक विभाग, नवोदय विद्यालय, बँक, राष्ट्रीय नमुना पाहणी, केंद्रीय उत्पादन शुल्क आदी सर्व केंद्र शासनाच्या आखत्यारीत येणाऱ्या संस्थांमधील मतदार कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. रजेअभावी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
बँकर्स समितीच्या तालुकास्तरावरील सभा रद्द
यवतमाळ, दि. 1 : तालुकास्तरीय बँकर्स समितीच्या फेब्रुवारी महिन्यातील बैठकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यानच्या तालुकास्तरीय सभा रद्द करण्यात आल्या आहे. यात महागाव, नेर, वणी आणी आर्णी येथील सभा पुढील कालावधीत घेण्यात येणार आहे, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांनी कळविले आहे.
00000
दुर्भा रेतीघाटांसाठी ई-निविदा
यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यातील दुर्भा, ता. झरीजामणी येथील रेतीघाटाचा ई-निविदा, ई-लिलाव पद्धतीद्वारे 10 फेब्रुवारी रोजी फेरलिलाव करण्यात येणार आहे. इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिलाव प्रक्रियेनुसार दिनांक 4 फेब्रुवारीपासून बीडर रजीस्ट्रेशन सुरू होईल. 7 फेब्रुवारी रोजी बीडर रजिस्ट्रेशन बंद होऊन याच दिवसापासून ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. 9 फेब्रुवारी रोजी ई-निविदा भरणे बंद होईल. 10 फेब्रुवारी रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात येईल, तसेच ई-लिलाव करण्यात येईल.
ई-लिलावाबाबत अधिक माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिलावाच्या अटी, शर्ती व अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळांव्यतिरीक्त जिल्हा खनिकर्म कार्यालय, तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
दारव्हा येथील आरटीओचा कॅम्प रद्द
यवतमाळ, दि. 1 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दि. 3 फेब्रुवारी रोजी दारव्हा येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. काही अपरिहार्य कारणास्तव हा कॅम्प रद्द करण्यात आला आहे.
नागरीकांच्या सोयीसाठी प्रत्येक महिन्यात दारव्हा येथे परिवहन विभागाचे शिबीर आयोजित करण्यात येते. या कॅम्पच्या कार्यालयाची जागा इतरत्र हलविण्याचे तसेच शिबिर कार्यालय विश्रामगृह दिग्रस येथे आयोजित करू नये, असे बांधकाम विभागाने कळविले आहे. त्यामुळे शिबीर कार्यालयास दुसरी जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला दारव्हा येथे घेण्यात येणारा कॅम्प रद्द करण्यात आला आहे. नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000

रब्बी पिकाबाबत तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 1 : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत येथील वाघापूर रोडवरील कृषि संशोधन केंद्र, संशोधन संचालनालयाचे बियाणे सनियंत्रण कक्ष, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाच्या वतीने तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान पार पडले.
‘विदर्भ विभागातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांचे आणि उद्यानविद्याशास्त्र पिकांचे बिजोत्पादन’ याबाबत प्रशिक्षण पार पडले. वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे यांनी उद्घाटन केले. विभागीय कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सी. यू. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी संशोधन (बियाणे) उपसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे, आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील, उपसंचालक डी. बी. काळे, विभागीय कृषि संशोधन केंद्राचे बी. जी. गोंडाणे, कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी धीरज वसुले आणि राष्ट्रीय कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प प्रभारी संदीप कदम उपस्थित होते.
            डी. टी. देशमुख यांनी बियाण्याचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व याबाबत माहिती दिली. डॉ. एस. एम. घावडे यांनी कांदा आणि लसून बिजोत्पादन घेतल्यास अधिक नफा प्राप्त करता मिळविण्याबाबत दृष्य सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील यांनी यावर्षी गटामार्फत मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादनाचे कार्यक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
            सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे यांनी हवामान बदलामुळे पिकांची होणारी हाणी वाढत असल्याचे त्यांचा वेळीच अटकाव करण्याचे सुचविले. कपाशीवरील दहिया रोगाच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. बुरशीनाशकाचा वापर नियमितपणे करावा, सेंद्रीय शेती, आधुनिक शेती, एकात्मिक शेती आदी पिकांच्या बिजोत्पादनाबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अनिल ठाकरे, डॉ. गोपाळ ठाकरे, प्रा. अंजली गहरवार यांनी बिजोत्पादना संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे शंका निरसन केले. बी. जी. गोंडाने यांनी बिजोत्पादनातील महत्वाचे बारकावे छायापंकनाच्या माध्यमातुन समजाऊन सांगितले.
            डॉ. सी. यू. पाटील यांनी पिकांच्या बिजोत्पादनाबद्दल मार्गदर्शन केले. तणनाशकाचा वापर करताना काळजी घेतली नसल्यास पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहून तणनाशकाचा वापर करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, घाटंजी आणि यवतमाळ तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. दि. २५ जानेवारी रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. धीरज वसुले यांनी प्रास्ताविक केले. वंदना जाधव, निळकंठ मानकर, नारायण कुरसुंगे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी