महाराष्ट्र शासन
वृत्त क्र.594                                जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                         दि.01/07/2017

वृक्ष लागवड मोहिमेने राज्याची वाटचाल पर्यावरण क्रांतीकडे
- पालकमंत्री मदन येरावार
* एकच लक्ष 4 कोटी वृक्ष लागवडीचा जिल्ह्यात शुभारंभ
यवतमाळ, दि. 01 : आज संपूर्ण देश जीएसटीच्या माध्यमातून अर्थ क्रांतीकडे जात आहे. आपल्या राज्यातसुध्दा ग्रीन स्टेट विथ ट्रिज ही संकल्पना राबविण्यात येत असून ही एकप्रकारे पर्यावरण संदर्भातील जीएसटीच आहे. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून आपल्या राज्याची वाटचाल पर्यावरण क्रांतीकडे होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
वन विभागाच्या वतीने फॉरेस्ट पार्क जांब येथे आयोजित 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, राळेगावचे आमदार डॉ.अशोक ऊईके, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, मुख्य वनसंरक्षक जी.टी.चव्हाण, उपवनसंरक्षक बी.एन.पिंगळे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.मदन येरावार म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षापासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेमध्ये वन विभागासोबतच शासनाचे इतर विभाग व सामाजिक संस्था सहभागी होत आहे. वृक्ष लागवड मोहिम ही एक लोकचळवळ बनली आहे. त्यामुळेच या मोहिमेची  नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड  ने  घेतली आहे. जल, जंगल, जमीन ही निसर्गाची देण आहे. मात्र मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी ही संपत्तीच नष्ट केल्यामुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट आपल्यासमोर उभे आहे. याचा सामना करायचा असेल तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपली संस्कृती ही पुजनाची संस्कृती आहे. तुळशी, वड, पिंपळ, कडूलिंब, पळसाची फुले आदी झाडांचे सणानुसार आपल्या संस्कृतीत महत्व आहे. आपण त्याची पुजा करीत असतो. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वन औषधीसुध्दा निर्माण होते. त्यामुळे वनांचे संवर्धन करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. गतवर्षी वृक्ष लागवडीसाठी दोन कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लागवड झाल्याचा आनंद आहे. यावर्षीसुध्दा  4 कोटीपेक्षा जास्त वृक्ष संपूर्ण राज्यात लावले जातील, अशा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
लावलेले प्रत्येक झाड जगविणे हे मानवाचे कर्तव्य आहे. रस्त्यांची रुंदी वाढवित असतांना वृक्षांचे हस्तांतरण दुसऱ्या जागेवर करण्यात येत आहे. या कामात सर्वांचे योगदान मिळत असून प्रत्येकजन पर्यावरणाचा मित्र बनला पाहिजे. राज्य शासनाने वन विभागाच्या वृक्ष लागवडीसाठी 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वनउद्यान हे मॉडेल ठरेल. इतर झाडांसोबतच वन औषधींची  झाडे येथे लावावीत, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
सृष्टीला वाचविण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम – हंसराज अहिर
            शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यवतमाळ जिल्ह्याने मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. वृक्ष लागवड कार्यक्रम हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम असून सृष्टीला वाचविण्यासाठी या माध्यमातून सर्वांचे सहकार्य मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. गतवर्षापासून एक चांगला उपक्रम या राज्यात सुरु झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात वनांचे प्रमाण चांगले असले तरी हा समतोल सर्व जिल्ह्यात असला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्याने स्वीकारलेले 29 लक्ष वृक्ष लागवडीचे  उद्दिष्ट मोठे आहे. यात सर्वांचा सहभाग मिळणे गरजेचे  आहे. हे एक जनआंदोलन असून यातून समाजाची जनजागृती होत आहे, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.
वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी योगदान द्यावे - राज्यमंत्री संजय राठोड
        राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे लोकांना वृक्ष लागवडीचे महत्व कळले आहे. वनविभाग व इतर सहकार्यांच्या मदतीने वनांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात वृक्षक्रांतीचे वनमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. आपल्या संतांनीसुध्दा वन संवर्धनाची शिकवण दिली आहे. समोरच्या तीन वर्षात शासनाच्यावतीने 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सर्वांनी योगदान द्यावे, असे राज्यमंत्री राठोड म्हणाले.
            तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगिताने झाली. यावेळी हरीत क्रांतीचे जनक व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच वन विभागाच्यावतीने सर्वधर्म वने या संकल्पनेनुसार चिमुकल्यांनी विविध धर्माची वेशभुषा साकारली. भारताचे वर्णन करणारे गीत यावेळी सादर करण्यात आले. तसेच पाचव्या वर्गात शिकणाऱ्या बोधीसत्व खंडेराव या विद्यार्थ्याच्या सीडबॉल या प्रकल्पाचे मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक बी.एन.पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला फ्री मेथाडिस्ट, सेंट अलॉयसिस, सेंट जोसेफ, स्कॉऊट गाईड, राष्ट्रीय हरीत सेना आणि बोधीसत्व फाऊंडेशनचे विद्यार्थी तसेच नेहरू युवा केंद्र, जेष्ठ नागरिक क्लब, रोटरी क्लब, इंडियन मेडीकल असोसिएशन यवतमाळ शाखा, जिजाऊ फाऊंडेशन, कोब्रा ॲडव्हेंचर ॲन्ड नेचर क्लब यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी