शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा -पालकसचिव व्ही. गिरीराज

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
यवतमाळ, दि. 29 : शेतक-यांसाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभही शेतक-यांना मिळत आहे. अनेक छोट्या आणि परवडणा-या उपक्रमातून शेतक-यांना चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र ही माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तरच त्यांचे जीवनमान उंचावेल. याबाबत अधिका-यांनी गांभिर्याने लक्ष देऊन शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव (व्यय) तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन उपस्थित होते.
पालकसचिव व्ही. गिरीराज म्हणाले, कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतक-यांच्या उत्पादनाबाबत माहिती ठेवावी. शेततळे, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार आदी माध्यमातून त्या शेतक-यांच्या उत्पादनात किती वाढ झाली. कृषी सेवकांच्या माध्यमातून पाच – सहा गावांची स्वतंत्रपणे पाहणी करून पिकाबाबत मुल्यमापन करावे. मुंबई आयआयटीने विकसीत केलेले पॅडल पंप हे शेतक-यांसाठी उपयुक्त ठरू शकते. या नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना देऊन त्याचे फायदे सांगावेत. कालव्यांचा उतार, त्यात वाढलेले गवत आदी कामे संबंधित यंत्रणेने त्वरीत केली तर शेतक-यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळून उत्पादनही वाढण्यास मदत होईल, असे पालकसचिव व्ही. गिरीराज म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, पॅडल पंपचा उपयोग जिल्ह्यातील इतर भागात करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. भाजीपाला उत्पादक शेतक-यांबरोबरच इतर उत्पादन घेणा-यांनासुध्दा याविषयी माहिती द्यावी. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत शेतक-यांच्या हाताला जास्त काम राहात नाही. त्यामुळे त्यांना कृषी विषयक विविध तंत्रज्ञान, इतर माहिती देण्यावर अधिका-यांनी भर द्यावा, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
यावेळी मुंबई आयआयटीचे विकास झा यांनी पॅडल पंपविषयी माहिती दिली. यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यात या पंपचा उपयोग केला जात आहे. या पंपामुळे जमिनीतील 25 फूट खालून पाणी 35 फुट उंचीवर घेऊन जात येते. घाटंजी तालुक्यातील दहा गावात या पंपचा वापर करण्यात येत आहे. तसेच यातून काही शेतक-यांनी भाजीपाला आणि टमाटरचे उत्पादन घेतले व ते गावातच विकले, असे झा यांनी सांगितले.
यावेळी पालकसचिव यांनी पीक परिस्थिती, जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस, मुख्यमंत्री ग्रामविकास दूतांमार्फत होणारे काम, वर्धा – नांदेड रेल्वे प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, म्हाडातील सदणिका हस्तांतरण, सिंचनाची परिस्थिती, पीक कर्ज वाटप, वृक्ष लागवड मोहीम, जिल्ह्यातील नर्सरीच्या माध्यमातून  मिळणारा रोजगार, घरकूल, स्वच्छ भारत अभियान, संजय गांधी निराधार योजना, बळीराजा चेतना अभियानांतर्गत होणारी कामे आदी विषयांचा आढावा घेतला.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                
                                                                              0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी