अमृत योजनेत अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर - पालकमंत्री मदन येरावार

पिंपळगाव येथे पाण्याच्या टाकीचा बांधकाम पायाभरणी समारंभ
यवतमाळ, दि. 23 : शहरातील नागरिकांच्या पाण्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन-अडीच वर्षांत किंवा त्यापूर्वीच शहर आणि शहरालगतच्या भागातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत बांधण्यात येणा-या सर्व 19 टाक्यांमध्ये बेंबळा प्रकल्पातून पाणी भरण्याची सिस्टीम सुरु होईल. टाकी भरली की ती आपोआपच बंद होईल. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. या योजनेंतर्गत 4 मेगावॅटच्या सोलर सिस्टिमसाठीसुध्दा 20 एकर जागा घेण्यात आली आहे. अशा एक ना अनेक अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर अमृत योजनेत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
शहरातलगत असलेल्या पिंपळगाव प्रभाग क्रमांक 4 येथे अमृत योजनेंतर्गत 5 लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकाम पायाभरणी समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, मंचावर नगर परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, उपअभियंता अजय बेले, न.प. स्थायी समिती अध्यक्ष रेखा कोठेकर, बांधकाम सभापती अमोल देशमुख, सभापती सुजित राय उपस्थित होते.
युतीच्या काळात राज्यात अनेक धरणे बांधण्यात आली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, विधानसभेत विविध आयुधांचा वापर केल्यानंतर शहरालगतच्या भागासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. शहराचा विस्तार वेगाने होत आहे. आजुबाजूचा परिसर आता नगर परिषदेमध्ये आला आहे. या नागरिकांना 24 तास पाणी पुरविण्यासाठी केंद्राच्या मदतीने शहरात अमृत योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी 19 टाक्यांचे बांधकाम दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होईल. या योजनेंतर्गत दुहेरी पाईप लाईन असून कोणाला पाणी कनेक्शन घेण्यासाठी आता रस्ता खोदण्याची आवश्यकता नाही. कनेक्शन देण्यासाठी ठराविक अंतरावर विशेष टी- पॉईंट उभारण्यात येतील. शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु असून खोदकासोबतच पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. जीवन प्राधिकरण या योजनेवर गांभीर्याने काम करीत आहे. एखाद्या प्रकल्प ठराविक कालावधीत कंत्राटदाराने पूर्ण केला नाही तर दंड आणि वेळेच्या आधी काम पूर्ण केले की त्याला योजनेच्या 3 टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा शासनाचा निर्णय आहे. अमृत योजना ही ठराविक कालावधीच्या आधीच पूर्ण केली जाईल, असा विश्वास आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
309 कोटी रुपयांची ही योजना असून शहरात ज्या-ज्या भागात पाण्याच्या टाक्या मागण्यात आल्या तेथे सर्वसहमतीने टाक्यांचे बांधकाम होत आहे. यासाठी संबंधित परिसरातील नागरिक अभिनंदनास पात्र आहे. भविष्यात पाणी प्रश्न निमार्ण होऊ नये म्हणून एकाच वेळी या टाक्यांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नवीन टाक्यांच्या खालच्या जागेवर सौंदर्यीकरण करण्याचे प्रयोजन आहे. अवैध पाणी कनेक्शन घेणा-यांनाही या योजनेमुळे आळा बसेल. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले. मात्र मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा –हास केला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. गतवर्षी पासून राज्यात वृक्ष लागवड मोहीम होती घेण्यात आली आहे. मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष, यावर्षी 4  कोटी तर पुढील वर्षी 13 कोटी वृक्षांची लागवड करायची आहे. केवळ वृक्ष लावून जबाबदारी संपणार नाही तर त्याचे संगोपनही महत्वाचे आहे. कचरा, घनकचरा व्यवस्थापन अंडरग्राऊंड ड्रेनेज या योजनेत समाविष्ठ आहे. शहरात अतिशय नियोजनपध्दतीने विकास कामे सुरु आहेत. यात सीएसआर व विविध योजनांमधून रस्ते, भुमिगत विद्युत लाईन, हायमास्ट-एलएडी लाईट, पर्यटनातून विकास यासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षणातून बेरोजगार युवकांच्या हाताला काम, सोबत व्यवसायासाठी मुद्रा बँकेचे कर्ज आदींचा यात समावेश आहे. शेवटी नागरिकांच्या क्रयशक्तीतूनच शहराचा, जिल्ह्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. माणसाच्या अंगी असलेल्या गुणांना विकसीत केले आणि संधी मिळाली की त्या संधीचे सोने नागरिकांना करता आले पाहिजे. विविध क्षेत्रात एकाच कुटुंबातील व्यक्ती कार्यक्षम झाल्या तर त्या कुटुंबाची आवक वाढते. ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. या सर्व बाबींसाठी नागरिकांनीही योगदान देणे गरजेचे आहे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. तत्पूर्वी मौजा पिंपळगाव परिसरात तारामाय मंदीर ते समाजकार्य महाविद्यालयापर्यंत असलेल्या 2 किमी रस्त्याचे आणि बायपास ते विठ्ठल वाडी तिरुपती सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भडके यांनी केले. संचालन राजाराम विठाळकर यांनी तर आभार प्रा. कमल राठोड यांनी मानले. यावेळी विजु खडसे, गंगाधर राऊत, प्रल्हाद तोडसाम, ज्योती मानमोडे, अशोक नारखेडे, शारदा गायधने, संदीप गाडेकर, विलास गायधने यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

उमरसरा येथे टाकीच्या बांधकामाचे भुमिपूजन – अमृत योजनेंतर्गत शहरातील उमरसरा येथील 9 लक्ष लीटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, नगर परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, नगरसेवक दिनेश चंडाले, रिता भावतोडे, हेमंत कांबळे, मिलिंद पांडे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
                                                                    000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी