मानवतेच्या दृष्टिकोनातून दिव्यांगांसाठी काम करा - पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ दि. 21 : दिव्यांग व्यक्तिंना देवाने एक अवयव कमी दिला असला तरी त्यांना एक गुण अतिरिक्त असतो, असे मानले जाते. दिव्यांग व्यक्तिंच्या समस्यांबाबत विधानसभेत चर्चा केली जाते. या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सरकार, प्रशासन या आपली काळजी घेते, असा विश्वास दिव्यांग व्यक्तिंमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी अधिका-यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग व्यक्तिंच्या समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र  प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तिंसाठी अनेक योजना आहेत असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, दिव्यांगांसाठी कायद्याने तरतूद केलेली 3 टक्के रक्कम त्यांच्यासाठी खर्च झाली पाहिजे. या नागरिकांना आपण काय लाभ देऊ शकतो, याचा विचार अधिका-यांनी कराव. अपंग कल्याण महामंडळ, नगर पालिका प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग यांनी समन्वयातून दिव्यांगांना लाभ द्यावा. या योजनेंतर्गत दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या आवश्यता पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी असलेल्या झेरॉक्स मशीन, संगणक आदींचा लाभ मिळाला तर त्यांच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह होऊ शकतो. जिल्ह्यात अपंगांची यादी अपडेट करून आपापल्या नगर पालिका क्षेत्रात किती अपंग नागरिक आहेत, याबाबत नगर पालिका प्रशासनाने त्यांच्या समस्या सोडवाव्यात. तसेच प्रत्येक नगरपालिका स्तरावर दिव्यांग व्यक्तिंसाठी मेळावे घेतले तर त्यातून विविध योजनांची त्यांना माहिती  मिळू शकते. एवढेच नाही तर नगर पालिकेमध्ये रोटेशन पध्दतीने दिव्यांग व्यक्तिंची मानधन तत्वावर नियुक्ती करून या योजना इतरांना समजावून सांगण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. तसेच प्रत्येक पालिका क्षेत्रावर दिव्यांगांसाठी हेल्पलाईन सुरु करावी. जिल्ह्यात एकूण दिव्यांग व्यक्ति किती आहेत. त्यांना व्यवसाय करावयाचा असेल तर 200 चौ. फूट जागा उपलब्ध करून देता येते, असे शासनाचे निर्देश आहेत. श्रावणबाळ, संजय गांधी, घरकुल योजनेचा लाभसुध्दा त्यांना देता येऊ शकतो. त्यासाठी अधिका-यांनी तळमळीने काम करणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
आपापल्या परिसरातील सर्व नगरसेवकांना दिव्यांग व्यक्तिंसाठी असलेल्या योजनांची अधिका-यांनी माहिती द्यावी. जेणेकरून त्या प्रभागातील व्यक्तिंना त्याला लाभ घेता येईल. बचतगट, व्यायाम शाळा, खेळाचे साहित्य, दिव्यांगांसाठी पेन्शन योजना आदी बाबी तरतूद असलेल्या निधीमधून करता येते. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी जिल्ह्यात अपंगांसाठी असलेल्या अनुदानित आश्रमशाळांची पालकमंत्री येरावार यांनी माहिती जाणून घेतले. अधिका-यांनी या आश्रमशाळांना नियमित भेटी देऊन तेथील समस्या तातडीने सोडवाव्यात, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मंगला मून, अपंग कल्याण मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एस. तारे, यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेहरे, डॉ. सुरेंद्र गव्हार्ले यांच्यासह विविध नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी