भुमिगत विद्युत वाहिन्यांमुळे नागरिकांना सुरळीत सेवा मिळेल - पालकमंत्री मदन येरावार

उपरीतार विद्युत मार्ग भुमिगत करण्याच्या कामाचे भुमिपूजन

यवतमाळ, दि. 21 : पावसाळ्याच्या दिवसात वीज, वादळी वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. शिवाय अपघात होण्याची शक्यतासुध्दा जास्त असले. त्यातच संपूर्ण शहरात उपरीतार विद्युत जोडण्या असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. शहराचे हे बकालपण दूर करण्यासाठी तसेच ग्राहकांना अखंड, निरंतर आणि सुरळीत सेवा देण्यासाठी भुमिगत विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नविकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
येथील विद्युत भवन कार्यालयात पायाभूत आराखडा योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या उपरीतार मार्ग उच्चदाब व लघुदाब वाहिन्या भुमिगत करण्याच्या कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी  मंचावर यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड उपस्थित होते.
शहरात आज पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजना, भुमिगत केबल, कृषी फिडर योजना आदी सुरु आहेत. सर्वांच्या समन्वयातून ही कामे होत आहे. सर्व बाबतीत यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास करण्याला सुरवातीपासूनच आपले प्राधान्य राहिले आहे. भुमिगत विद्युत जोडणीमुळे ग्राहकाला चांगली सेवा मिळेल. विशेष म्हणजे शहर सुंदर होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला होणारे अतिक्रमण थांबेल. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. भुमिगत विद्युत वाहिन्यांमुळे रस्त्यावर असलेले विद्युत खांब निघून नागरिकांसाठी रस्ता मोकळा होईल. ही दुहेरी वाहिनी असल्यामुळे ग्राहकांना कोणताही खंड न पडता विद्युत पुरवठा सुरु राहील. एका वर्षात हे काम होणार आहे, याचा आनंद आहे. नागरिकांना चांगली सेवा देणे हे विद्युत विभाग, महावितरणला बंधनकारक आहे. त्यासाठी प्रयत्नसुध्दा केले जात आहे. पायाभूत सुविधांसाठी महावितरणला 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरात हायमास्ट लाईट, एलएडी लाईटसाठी आलेला निधी गतीने खर्च झाला पाहिजे. तसेच निघालेल्या विद्युत खांबाजवळ पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोणाचेही विस्थापन न करता पंतप्रधान आवास योजनेत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
आजकाल इलेक्ट्रिक बिलाची व्यवस्था मोबाईलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आपले बील आपण आपल्या मोबाईलद्वारे महावितरणकडे पाठविल्यास बिलाच्या रकमेचा मॅसेज नागरिकांना होईल. त्यासाठी विद्युत विभागाकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. सुरवातीच्या काळात वीज गेली तर विद्युत कार्यालयातील फोनसुध्दा उचलला जात नव्हता. आता मात्र तक्रारींचे निराकरण जलद गतीने होत आहे. विद्युत विभागाच्या हेल्पलाईनचासुध्दा ग्राहक वापर करू शकतात. नागरिकांना चांगल्या सेवा पुरविण्याच्या उपक्रमाचे आज भुमिपूजन झाले, याचा आनंद आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. मुद्रा बँकमध्ये कर्जाची सुविधा, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आदी बाबींच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल. नगर परिषदांनी आपली आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काही ग्राहकांच्या तक्रारींचे पालकमंत्र्यांनी निराकरण केले.  
प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता यांनी सांगितले की, राज्यात यवतमाळ ही पहिली नगर पालिका आहे, जेथे उपरी वाहिन्यांचे भुमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर होत आहे. या वाहिन्यांमुळे ग्राहकांना योग्य दाबाचा व सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान कमी होणार असून वीज चोरी रोखण्याससुध्दा मदत होईल. या भुमिगत विद्युत वाहिनीसाठी 16.23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून कामाची निविदासुध्दा काढण्यात आली आहे. सदर काम एक वर्षात पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कोळशे यांनी तर आभार संजयकुमार चितळे यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी