अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

यवतमाळ, दि. 25 : सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. या दिवसात दुषित पाण्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना उकळलेले पाणी द्यावे. तसेच जिल्हा आरोग्य विभागातर्फे 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक टी.जी.धोटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ.हर्षवर्धन बोरा, डॉ.अजय केशवाणी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.राजेश शाहू उपस्थित होते.
अतिसार नियंत्रण पंधरवाड्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी गावा-गावात जाऊन 0 ते 5 वयोगट असलेल्या कुटूंबाला ओआरएसचे पॉकेट तसेच झिंगच्या गोळ्या देणार आहे. या दिवसात पालकांनी उकळलेले पाणी थंड करून तसेच ओआरएस टाकून बालकांना द्यावे. गावासोबतच तांडा, वाडा, वस्त्या आदी ठिकाणीसुध्दा या सामुग्री पोहोचविण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घ्यावी. जेणेकरून या वस्त्यांवरील बालकांना अतिसाराची लागण होणार नाही. शिक्षण विभागाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी स्वच्छता, नखे काढणे, स्वच्छ हात धुणे आदी बाबींबाबत मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 0 ते 5 वर्ष वयोगटातील 2 लक्ष 95 हजार 245 लाभार्थींना 2363 आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृह भेटी देऊन झिंग गोळ्या, ओआरएस वाटप करणार आहेत. तसेच जिल्ह्यात 3221 ओआरटी कॉर्नर प्रत्येक अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक  दवाखाना, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 24 तास कार्यरत राहणार आहे. या मोहिमेंदरम्यान आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, आरेाग्य कर्मचारी गावातील गरोदर माता व स्तनदा माता करीता प्रात्यक्षिक व समुपदेशन करणार आहे. कुपोषित बालकांना संदर्भ सेवासुध्दा देण्यात येईल. सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये हात धुवा मोहीम राबविण्यात येणार आहे.
                                                           000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी