कर्जमाफी योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त होईल
- पालकमंत्री मदन येरावार
* पिंप्री बुटी येथे लाभार्थ्यांच्या अंतरीम यादीच्या वाचनाचा शुभारंभ
यवतमाळ, दि. 13 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही आजपर्यंतच्या इतिहासात अभुतपूर्व आहे. या कर्जमाफी योजनेत कुटूंबाची व्याख्या, आधारलिंक यासारखे पारदर्शक निकष असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. एकप्रकारे ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना ठरेल, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
पिंप्री बुटी येथे ‘बँक आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या अंतरीम यादीच्या वाचन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पिंप्री बुटी ग्रामविविध कार्यकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिणी दरणे, बँकेचे उपाध्यक्ष अनिरुध्द लोणकर, जिल्हा परिषद सदस्य आशीष पाटील लोणकर, पिंप्री बुटीचे सरपंच प्रफुल्ल बोबडे, हातगावचे सरपंच रवी बलके उपस्थित होते.
सामाजिक दायित्वातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेला ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम अभिनंदनीय आहे. 34 हजार कोटी रूपयांची ऐतिहासिक कर्जमाफी शासनाने जाहीर केल्यामुळे त्यांचा फायदा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जमाफी योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या काही शंका-कुशंका असल्यास त्याचे निराकरण बँकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे. आजही 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीत गुंतवणूक वाढविली पाहिजे यासाठी शासन कटीबध्द आहे. मा.मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलयुक्त शिवार या योजनेत शासनाच्या विविध 14 विभागांचे योगदान आहे. या जलयुक्त शिवार योजनेला आधुनिकतेची जोड देऊन गुगल मॅपींगच्याद्वारे कामाचे चित्रीकरण करण्यात येते. ठेकेदार आणि अधिकारीसुध्दा पारदर्शकतेनुसार या अभियानात काम करीत असून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी अडविले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त्‍ शिवार ही योजनासुध्दा शासनाने सुरु केली आहे. विदर्भ, मराठवाडा हा कोरडवाहू भाग असल्याने धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. मार्च 2018 पर्यंत मागेल त्याला कृषी कनेक्शन देण्याची शासनाची योजना आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करण्यात येत असून निसर्गाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी देशपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सर्वात कमी पाऊस असूनसुध्दा इस्त्रायल हा देश शेतीचे सर्वात जास्त उत्पादन घेतो. या तंत्रज्ञानाचा आपल्याकडेही उपयोग करण्यात येणार असून पावसाचा अंदाज घेण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान आपल्या भागात उपयोगात आणले जाईल. शेतकऱ्यांना सलग वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिणी प्रकल्पांतर्गत 12 तास वीज देण्याची योजना आहे. शेती क्षेत्रात अधिक उत्पन्न वाढविण्यासाठी अमूल,  वारणा, गोकूळ, मदर डेअरी यांच्यासह नागपूर येथील पतंजली फुडपार्क यांच्यासोबत अनेक करार करण्यात आले आहे. या कंपन्यांना शेतकऱ्यांचा माल घेणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना असून नागरिकांनी या योजनांचा अभ्यास करावा. गावाच्या प्रगतीसाठी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे. तसेच बँकेनेसुध्दा प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाचन करावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
या विभागाच्या विकासासाठी अनेक योजना आपल्या कार्यकाळात आणल्या आहेत. धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत विहिरीतून निघणाऱ्या दगडातून पांदण रस्ते मोकळे करण्यात येईल. शासनाच्या उज्वला गॅस योजना, कौशल्य  विकास योजना या अंतर्गत अनेक नवनवीन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला उद्योगासाठी मुद्रा बँकेची जोड देण्यात आली आहे. एकाच कुटूंबातून चार जण वेगवेगळ्या क्षेत्रात गतिमान झाले तर कुटूंब समृध्द होईल. त्यामुळे शासनाच्या योजनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर व्यवस्थापक अरविंद देशपांडे म्हणाले, लाभार्थ्यांना या योजनेची माहिती व्हावी, प्रत्येक लाभार्थ्याचा कोणत्या येाजनेत सहभाग होतो याची माहिती मिळावी तसेच योजनांविषयी शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 4 लक्ष 17 हजार 402 शेतकरी आहेत. यापैकी प्राथमिक संस्थेचे सभासद 3 लक्ष 94 हजार 498 असून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 98 हजार 287 आहे. थकीत कर्जदार 1 लक्ष 33 हजार 885 असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची संख्या 64 हजार 402 आहे. यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दीड लक्ष रूपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील 1 लक्ष 5 हजार 501 शेतकऱ्यांना होणार असून ही रक्कम 739 कोटी आहे. दीड लक्ष रूपयांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लक्ष कर्ज पूर्ण माफ होवून वरील उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या 18 हजार 384 आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना परतफेडीच्या 25 टक्के प्रोत्साहनपर म्हणून 125 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. कर्जमाफी  योजनेत समाविष्ठ असणाऱ्या जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या अंतरीम यादीचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला बँकेचे संचालक विनायक येकरे, डॉ.रविंद्र देशमुख, संजय जोशी, पिंप्री बुटी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण जयस्वाल, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या अर्चना माळवी, बाळासाहेब शिंदे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पुर्वी पिंप्री बुटी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पालकमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते ‘महा ई-लर्निंग सॉफ्टवेअर’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी