देशाच्या विकासासाठी छोटे कुटुंब ठेवणे आवश्यक
- जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन
यवतमाळ, दि. 11 : आज देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येचा  परिणाम देशाच्या विकासावर होतो. छोटे कुटुंब असले तर आपण आपल्या पाल्याला शैक्षणिक, आरोग्य तसेच  आदी सुविधा चांगल्याप्रकारे देऊ शकतो. परिणामी आपल्या कुटूंबाचा विकास होण्यास मदत होते. हीच बाब देशासाठीसुध्दा आवश्यक ठरत असल्यामुळे देशाच्या विकासासाठी कुटुंब छोटे ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित जनजागरण रॅलीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधूरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकूमार, नगर पालिकेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, आरोग्य सभापती नंदिणी दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड उपस्थित होते.
सद्यास्थितीला देशाची लोकसंख्या 121 कोटी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, या वाढत्या लोकसंख्येला कौशल्यपूर्ण बनविणे हे आपल्यासमोर एक आव्हान आहे. पूर्वीच्या काळात एक – एका कुटुंबाकडे 20 – 30 एकर शेती असायची. मात्र आता त्याच शेतीचे 2 – 3 एकरात तुकडे पडले आहेत. हे सर्व वाढत्या लोकसंख्येमुळे झाले असून त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. कृषीप्रधान देशात हे चित्र निराशाजनक आहे. ग्रामीण भागात आजही कुटूंब नियोजनाबाबत व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात मृत्युदर जास्त होता. आपली मुले जिवंत राहिल याची पालकांना शाश्वती नव्हती. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. आता मात्र घरोघरी आरोग्य सुविधा पोहोचल्यामुळे मृत्युदर कमी झाला आहे.
शासनाच्या 108 या क्रमांकाच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा तात्काळ नागरिकांपर्यंत पोहचत आहे. कुटूंबात एक किंवा दोन पाल्य असले तर आपण त्यांना चांगले आरोग्य, शिक्षण आदी सुविधा उत्तमप्रकारे देऊ शकतो. आताच्या यूवा पिढीने तर एकाच पाल्याचा विचार करावा. असा संकल्प आजच्या या लोकसंख्यादिनी तरूण दाम्पत्यांनी केला तर देशाच्या प्रगतीसाठी त्यांचाही हातभार लागेल.
देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात लिंग गुणोत्तर (947) आहे. देशात हा आकडा 940 तर राज्यात 925 आहे. तसेच लोकसंख्या वाढीचा दर सुध्दा यवतमाळ जिल्ह्यात (12.9) कमी आहे. भारतात जन्मदर 20.8 असून राज्यात 16.3 आहे. तर हेच प्रमाण आपल्या जिल्ह्यात 15.4 आहे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधूरी आडे म्हणाल्या, कुटूंब नियोजनाचा प्रसार करणे गरजेचे आहे. मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून पालकांनी गर्भलिंगनिदान चाचणी करू नये. मुलगा आणि मुलगी दोघेही एक समान आहे. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे  त्यांनी  सांगितले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला म्हणाले, लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत पुढील 5 – 10 वर्षात चिनला सुध्दा मागे टाकेल. देशात उत्पन्नाचे स्त्रोत कमी आणि लोकसंख्या जास्त अशी परिस्थिती आहे. देशातील 65 टक्के लोकसंख्या 24 – 50 या वयोगटात असून काम करणारे हात जास्त कुशल कसे करता येईल, याचा विचार करणे गरजेचे  आहे. जास्तीत जास्त लोकांनी कुटूंब नियोजनाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी तर प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड.राठोड यांनी केले. मान्यवरांना हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीत महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर कन्या कनिष्ठ महाविद्यालय, महिला विद्यालय, संजिवनी नर्सिंग स्कूल, शासकीय नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह इंडियन मेडीकल असोसिएशन यवतमाळ शाखा, रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी  सहभागी झाले. पोस्टल ग्राऊंडवरून निघालेली ही रॅली शहरातील मेन रोड, बस स्टँड चौक, गार्डन रोड आणि परत पोस्टल ग्राऊंड येथे आली. रॅलीचा समारोप पोस्टल ग्राऊंड येथे करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ.डी.डी.भगत, डॉ.चव्हाण, डॉ.कोषटवार, प्रशासकीय अधिकारी विक्रम रेवडी यांच्यासह शाळा, महाविद्यालयाचे 700 विद्यार्थी उपस्थित होते.

000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी