महाराष्ट्र शासन
वृत्त क्र.635                                जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                         दि.13/07/2017

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तात्काळ लाभ द्यावा
- पालकमंत्री मदन येरावार
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विभागांचा आढावा
यवतमाळ, दि. 13 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना लागू केली आहे. योजना लागू होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत अवगत करून लाभार्थ्यांच्या अंतरीम याद्या वाचनाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र याबाबत राष्ट्रीयकृत बँका संथगतीने काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळण्यास अडचण होत आहे.  राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीष सरोदे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.
कर्जमाफी योजनेनंतर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेने तात्काळ 10 हजार रूपये उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे याबाबत विश्वास निर्माण करावा. बँका ह्या शेतकऱ्यांसाठी आहे केवळ नफा कमविण्यासाठी नाही, याचा विचार करावा. इतिहासात पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी झाली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या दारी जावे, असे आवाहन यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील एकूण पेरणीबाबत आढावा खत, बियाणे आदींची परिस्थिती तसेच आरोग्य विभाग, शासकीय आश्रम शाळा, विविध विभागातील रिक्त पदे, अन्न सुरक्षा योजना, आरोग्य सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, आदिवासी प्रकल्पाबाबत माहिती, रुग्णालयांचा आढावा, अंत्योदय, बीपीएल, एपीएल आदींबाबत माहिती घेतली.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी