राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक-यांबद्दल मानवीय दृष्टीकोन ठेवावा -किशोर तिवारी

              जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक
यवतमाळ, दि. 27 : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अडचणीच्या काळात शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या अंतर्गत दहा हजारांची अग्रीम रक्कम तात्काळ शेतक-यांना उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीसुध्दा राष्ट्रीयकृत बँका संथगतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक-यांबद्दल मानवीय दृष्टीकोन ठेवून त्वरीत रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अग्रणी बँक व्यवस्थापक कुमरे उपस्थित होते.
बँकेत येणा-या शेतक-यांचे कर्जमाफी, अग्रीम रक्कम आदींबाबत समाधान करा, असे सांगून किशोर तिवारी म्हणाले, पात्र शेतक-यांना तात्काळ अग्रीम रक्कम देण्यात राष्ट्रीयकृत बँकांना काय अडचण आहे. शेतक-यांच्या जमिनीची किंमत कोटी रुपयांमध्ये असते. मात्र राष्ट्रीयकृत बँका त्यांना लाखांचे पण कर्ज उपलब्ध करून देत नाही. जिल्ह्यातील ज्या 9 राष्ट्रीयकृत बँकांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत, त्याची अंमलबजावणी गतीने केल्यास सद्यस्थितीत जिल्ह्यातील 75 टक्के शेतक-यांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे याबाबत गांभीर्याने अंमलबजावणी करा. पात्र शेतक-यांची यादी फलकावर लावून अग्रीम रकमेचे वाटप सुरु झाले आहेत, असे फ्लेक्स बँकेच्या दर्शनी भागात लावा. जेणेकरून शेतक-यांना या बाबी माहिती होईल. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी लोकसहभागातून पैसा उभा करावयाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत जिल्ह्यातील विविध सहकाही संस्था, अशासकीय संघटना आदींनी सहकार्य करावे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, कर्जमाफी आणि अग्रीम रक्कमेबाबत राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या कामाची गती वाढवायला पाहिजे. दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील 25 हजार शेतक-यांना अग्रीम रकमेचे वाटप होण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ज्या बँका यात हयगय करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफीबद्दल माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शेतकरी बँकेच्या दारावर आला पाहिजे, अशा विश्वास बँकांनी निर्माण करावा. गटसचिवांमुळे याद्या रखडल्या असले तर त्यावर तोडगा काढून पात्र शेतक-यांना लाभ द्या, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तत्पूर्वी विविध विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यात जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृती, सिंचनाची अवस्था, वृक्ष लागवड मोहीम, खरीप हंगामातील पेरणी, अधिक लक्ष गाठण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, वनविभागाच्या माध्यमातून मिळणारे रोजगार, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे वाटप, शेतकरी आत्महत्यांबाबत आढावा, राजीव गांधी जीवनदायी योजना, बळीराजा चेतना अभियान अधिक लोकाभिमुख होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी बाबींचा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आढावा घेतला.
बैठकीला मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                  0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी