महाराष्ट्र शासन
वृत्त क्र.619                                जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                         दि.10/07/2017

12 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात बैठक
यवतमाळ, दि. 10 : समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती / फ्री शीपच्या रकमा ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु बंद खाते, चुकीचे खाते क्रमांक किंवा खात्यावरील नाव चुकीचे असणे, आयएफएससी कोड चुकीचे असल्याने सदर रकमा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याकरीता समाजकल्याण विभागातर्फे 12 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संबंधीत महाविद्यालयांचे प्राचार्य अथवा शिष्यवृत्ती विभाग हाताळणारे कर्मचाऱ्यांनी या बैठकीला हजर रहावे. तसेच विद्यार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याची पडताळणी करून सुधारीत खाते क्रमांकाची यादी व पुराव्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
वृत्त क्र.620
जागतिक लोकसंख्या दिनी रॅलीचे आयोजन
यवतमाळ, दि. 10 : 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे उद्या (दि.11) सकाळी 8 वाजता पोस्टल ग्राऊंड येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचे घोषवाक्य ‘जबाबदारी स्विकारा- कुटुंब नियोजनाचा अवलंब करा’ असे आहे. यावर्षी सदर कार्यक्रमांतर्गत 11 जुलै ते 24 जुलै लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. यात कुटुंब नियोजन पध्दतीचे प्रदर्शन आयोजन करणे, प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम, लाभार्थींना योग्य पर्याय निवडण्याबद्दल समुपदेशन करणे, कुटुंब आरोग्य मेळाव्याचे आयोजन, कुटुंब नियोजन साधनांचा वापर करणे, विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत तपासणी सुविधा राबविणे आणि तांबी बसविणे व स्त्री-पुरुष नसबंदी करणे यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जि.प.चे जिल्हा आरोग्‍य अधिकारी यांनी केले आहे.
0000000
वृत्त क्र.621
वाहन व सारथी 4.0 प्रणाली सुरु
यवतमाळ, दि. 10 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 6 जुलैपासून अनुज्ञप्ती विभागाकरीता सारथी 4.0 प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सध्यास्थितीत कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती सारथी 4.0 प्रणालीवर देणे सुरु करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्जदारांनी परिवहन विभागाच्या www.parivahan.gov.in या वेबसाईडवर सारथी 4.0 मध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीची पुर्व परवानगी घ्यावी.
7 जुलैपासून परिवहन व परिवहनेत्तर विभागांकरीता वाहन 4.0 प्रणाली सुरु करण्यात आली आहे. आकर्षक क्रमांकाकरीता 10 जुलैपासून  नियमित क्रमांक देण्याची प्रक्रीया सुरु होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000000
वृत्त क्र.622
तरुण व पात्र मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 10 : 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत तरूण व पात्र मतदार नोंदणी विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 78- यवतमाळ विधानसभा मतदारसंघ आणि 80-आर्णी, विधानसभा मतदार संघ केळापूर अंतर्गत घाटंजी तालुक्यातील 123 मतदान केंद्रावरील संक्षिप्त पुर्नरिक्षण दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै आहे.
तसेच विशेष मोहीम 8 जुलै व 22 जुलै या दोन दिवशी मतदान केंद्रावर राबविण्यात येणार आहे. तरुण व पात्र मतदारांनी (वयोगट 18 ते 21) नमुना 6 भरुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन यवतमाळचे व घाटंजीचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.
वृत्त क्र.623

करदात्यांच्या अडचणी संदर्भात 30 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 10 : 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात वस्तु व सेवाकर कायदा लागू झाला आहे. सदर कर पध्दतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निराकरण करण्यासाठी अमरावती वस्तु व सेवाकर विभागातील अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी कार्यशाळा घेतली आहे. व्यापारांना नोंदणी, विवरण दाखल करणे इत्यादीबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वस्तु व सेवाकर, अमरावती विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे.
व्यापारांना कर प्रणालीबाबत दडपण येवू नये, कर प्रणाली लागू करतांना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रीया यामध्ये अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील. कापड उद्योगातील व्यापाऱ्यांप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यात पात्र होत आहेत त्यांनी या संदर्भात 30 जुलै 2017 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन वस्तु व सेवाकर उपायुक्त यांनी केले आहे.
0000000
वृत्त क्र.624
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 10 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर जि.अमरावती येथे नोकरीच्या विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण कालावधी  हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतनसुध्दा देण्यात येते. प्रशिक्षणाचे दुसरे सत्र 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु होत असून या सत्रासाठी इच्छुक असणाऱ्या आदिवासी उमेदवारांनी 15 जुलै 2017 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
वृत्त क्र.625
सामाजिक न्याय विभागाचा टोल फ्री क्रमांक
यवतमाळ, दि. 10 : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आता टोल फ्री क्रमांकावर मिळणार आहे. सदर क्रमांक 1800-2331155 हा असून यात भारत सरकार मॅक्ट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परिक्षा फी प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार, कमर्शीयल पायलट लायसन्स कोर्स, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना, शासकीय वसतीगृहे व्यावसायिक पाठ्यक्रमाशी  संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व विद्यावेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व इतर विविध योजनांची माहिती या क्रमांकावरून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
0000000
वृत्त क्र.626
‍दिग्रस येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु
यवतमाळ, दि. 10 : शैक्षणिक सत्र 2017-18 करीता दिग्रस येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरु आहे. 8 व्या वर्गापासून पुढील शिक्षणासाठी या वसतीगृहात प्रवेश देण्यात येतो. भोजन व निवासाची  व्यवस्था मोफत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह व प्रसाधन भत्तासुध्दा देण्यात येतो. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. इच्छुक विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावे, असे शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे गृहपालांनी केले आहे.
0000000


वृत्त क्र.627
वणी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम
यवतमाळ, दि. 10 : वणी उपविभागांर्तग येणाऱ्या तालुक्यातील शोध बचाव पथक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी एस.एन.मिश्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार रवींद्र जोगी, विजय साळवे उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक तथा टी.डी.आर.एफ.चे संचालक हरीषचंद्र राठोड व त्यांच्या चमुने नैसर्गिक व मानवनिर्मिती आपत्ती आल्यास आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांचे  प्राण वाचविणे व पिडीतांची मदत करणे, प्रथमोपचार, शोध बचाव व आपत्ती व्यवस्थापनातील सर्व विषयांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणे कार्यक्रमाला वणी उपविभागातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शोध बचाव पथकाचे सदस्य उपस्थित होते.
0000000
वृत्त क्र.626
अनुदान योजना व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 10 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना, बीज भांडवल योजना व महामंडळाच्या विविध थेट कर्ज योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कर्ज मिळविण्याकरीता चांभार, ढोर, मोची, होलार समाजाच्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालयातून 10 ऑगस्ट पासून अर्ज घेवून आवश्यक कागदपत्रांसह 14 ऑगस्ट 2017 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सादर करावे. अधिक माहितीकरीता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंहामंडळाचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
0000000
वृत्त क्र.627
मादक द्रव्याचे व्यसन विरोधात प्रभातफेरीतून जनजागृती
यवतमाळ, दि. 10 : शेतकरी सुमपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यांच्यावतीने मादक द्रव्याचे व्यसन आणि बेकायदा तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय दिवस निमित्त जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.राठोड तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगळपल्लेवार, अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज सक्तेपार उपस्थित होते.
प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. तसेच मादक द्रव्याच्या व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होते. तसेच या पदार्थांची होत असलेली बेकायदा तस्करीमुळे गुन्हेगारीत वाढ होते. या विळख्यात विशेष करून तरूण वर्ग जास्त प्रभावीत होत आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहचणे गरजेचे असून सर्व जनतेला या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार यांनी आरोग्य व्यसनमुक्ती हे आपले ध्येय ठरवूनच आरोग्य सेवा देण्यात यावी असे सांगितले. यावेळी मादक द्रव्याचे व्यसन आणि बेकायदा तस्करी विरुध्द  शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन सरफराज सौदागर यांनी तर आभार किरण दिघडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रेरणा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी, परिचारीका प्रशिक्षणार्थी व लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक मोहीत पोहेकर, सागर परोपटे, अंजली रिठे, संजू शहाडे, संदीप उमरे, नीलेश लिचडे, समर्पिता जेकब, रेखा पिंपळकर आदींनी केले.
0000000



वृत्त क्र.628
संशोधन व विस्तार सल्लागार समितीची सभा संपन्न
यवतमाळ, दि. 10 : मध्य विदर्भ विभागाची संशोधन व विस्तार सल्लागार समितीची 55 वी (खरीप) सभा - 2017 विभागीय कृषी संशोधन केंद्र येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षपदी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.व्ही.एम.भाले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.डी.एम.मानकर, संशोधन संचालक डॉ.पी.जी.इंगोले, विस्तार शिक्षण संचालक विजय घावटे, विभागीय कृषी सहसंचालक डी.आय.गायकवाड, विभागीय कृषी सहसंचालक डॉ.आर.एम.गाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.यु.पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. निलीमा पाटील, नितीन हिवसे, गोपीभाऊ ठाकरे उपस्थित होते.
यावेळी प्रभारी कुलगुरु डॉ.भाले यांनी मागील खरीप हंगामात विदर्भात कापूस, तुर, सोयाबीन या पिकाचे उत्पादन वाढविल्यामुळे कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अभिनंदन केले. मध्य विदर्भ कोरडवाहू क्षेत्र असल्यामुळे बीटी कपाशीच्या उत्पादनात तफावत दिसते. त्यामुळे कोरडवाहू शेतीत देशी कपाशी एके 081 सारख्या वाणाची लागवड करणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन निलीमा पाटील यांनी तर आभार संदीप कदम यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापिठातील विविध विषयांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी, जिल्हा विकास अधिकारी व प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000
वृत्त क्र.629
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 10 : जिल्हा उद्योग केंद्र व इतर महामंडळ यांना सन 2017-18 करीता प्राप्त उद्दिष्ठ पुर्तीच्या अनुषंगाने कालबध्द कार्यक्रमांतर्गत इच्छुकांनी अर्ज सादर करावे. 1 जून 2017 ते 14 ऑगस्ट 2017 पर्यंत सदर अर्ज स्वीकारण्यात येतील. सदर कालावधीत प्राप्त झालेले अर्ज जिल्हास्तरीय कार्यपथक समितीच्या मंजूरीनुसार संबंधीत बँकांना पाठविण्यात येतील. इच्छुक अर्जदारांना अर्ज वितरण करण्याचा अंतीम दिनांक 10 ऑगस्ट असून अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांसह 14 ऑगस्टपर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
0000000
वृत्त क्र.630
केरोसिनचे जुलै महिन्यासाठी नियतन मंजूर
यवतमाळ दि. 10 : जिल्ह्यातील सिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी जून महिन्यांचे केरोसिन नियतन मंजूर झाले असून नागरीकांना वितरीत करण्यासाठी सदर नियतन घाऊक, अर्धघाऊन परवानाधरकांना उचल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 516 केएल केरोसिनचा यात समावेश आहे.
नियतनाबाबत सर्व तहसिलदारांना कळविण्यात आले असून सिधापत्रिकाधारकांना त्यांना देय असलेल्या प्रमाणात वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार परवानाधारकांनी मुदतीत नियतनाची उचल करून त्याचे वाटप करावयाचे आहे. उचल उशिरा केल्यास मुदत वाढ देण्यात येणार नाही. तसेच वाटप व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहे.
केरोसिनचे वाटप आकारणी करण्यात आलेल्या दरातच करावयाचा आहे. महिन्याच्या अखेरच्या तारखेस तालुका निहाय वाटपाची यादी सादर करणे आवश्यक आहे. या महिन्यासाठी 516 केएल इतक्या केरोसिन वाटपाचे नियतन करण्यात आले असून यापैकी 204 केएल नियतन द्वार वितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
0000000
वृत्त क्र.631
जुलै महिन्याचे अन्नधान्याचे परिमाण व दर जाहीर

यवतमाळ, दि. 10 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाचे जुलै महिन्याचे अन्नधान्याचे दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. निर्धारीत दर व परिमाणानुसार वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केल्या आहे.
            कौटूंबिक शिधा पत्रिकेवर देय असलेले गहू, तांदुळ, साखर, केरोसीनचा यात समावेश आहे. अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल तसेच कल्याणकारी संस्था व वसतीगृहांसाठीच्या दरांचा यात समावेश आहे. शिधा पत्रिकाधारकांना देय असलेल्या प्रमाणात तातडीने या वस्तुंचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. ज्या व्यक्तींनी धान्याची उचल केली नसेल त्यांना पुढील महिन्यात धान्य वाटप करावयाचे आहे. धान्यवाटप चुकीच्या पध्दतीने होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहे.
 0000000
वृत्त क्र.632
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी
यवतमाळ दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे  रविवार दिनांक 16 जुलै 2017 रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी / विक्रीकर निरिक्षक / पोलीस उपनिरिक्षक संयुक्त  (पुर्व) परिक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये फौजदारी दंड प्रक्रीया सहिंता 1973 चे कलम 144 जारी केले आहे.
या कलमातील तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या दिवशी परीक्षा चालु असतांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
0000000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी