शेतक-यांनो चुका दुरुस्त करण्यासाठी चावडी वाचनात सहभागी व्हा -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

रूई येथे संगणीकृत सातबारा चावडी वाचन कार्यक्रम
यवतमाळ, दि. 25 : सातबारा हा शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज आहे. सुरवातीच्या काळात सातबारा हा हस्तलिखीत होता. काही वर्षांनंतर त्याचे पुनर्लेखन होत होते. तोपर्यंत त्यात असलेल्या चुका तशाच राहात होत्या. आता मात्र संगणीकृत सातबारा देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे मूळ सातबारा आणि संगणीकृत सातबारा यात तफावत असेल तर शेतक-यांनी लगेच महसूल यंत्रणेच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यात त्वरीत दुरुस्ती केली जाईल. मात्र त्यासाठी शेतक-यांनी चावडी वाचनात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
रुई-वाई येथील नृसिंह मंदीर परिसरात आयोजित संगणीकृत सातबारा चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, रुईच्या सरपंचा रुपाली राऊत, उपसरपंच शाकीर काजी उपस्थित होते.
दि. 1 ऑगस्ट 2017 पासून ऑनलाईन पध्दतीने शेतक-यांना सातबारा देण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, आज जवळपास सर्वांजवळ मोबाईल आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला जागेवरच कळते. आपल्या महत्वाच्या कागदपत्रांवर आपले नियंत्रण असावे, यासाठी शासनाने सातबारा संगणीकृत केला आहे. यानंतर फेरफारसुध्दा ऑनलाईन होणार आहे. खरेदी-विक्री केल्यानंतर त्याबाबतची नोटीस आपल्याला मोबाईलवर ऑनलाईन पहावयास मिळते. हे सर्व उपक्रम राबवित असतांना आपल्या मूळ सातबारा आणि संगणीकृत सातबारामध्ये काही तफावत तर नाही, याची खात्री शेतक-यांनी करून घ्यावी. जर काही चुका आढळल्यास त्वरीत त्या महसूल यंत्रणेच्या लक्षात आणून दिल्या तर त्या चुका दुरुस्त करून अचून सातबारा देण्यात येईल. त्रृटी असलेल्या शेतक-यांची अधिका-यांनी वेगळी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
शेतक-यांनी संगणीकृत सातबारामध्ये आपले नाव, वर्ष, हंगाम, पिकाचे नाव, पीक फेरा, स्वरुप, क्षेत्रफळ, जलसिंचनाचे साधन, बँकेचा बोजा, सुधारणा पध्दती आदी बाबी तपासून पहाव्यात. चावडी वाचनाच्या कार्यक्रमातून या चुका दुरुस्त करण्याची शेतक-यांना संधी आहे. चुका लक्षात आणून देण्यासाठी शेतक-यांनी चावडी वाचनात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण कर्जमाफी योजनेबद्दल माहिती दिली. या गावातील 99 टक्के शेतकरी हे संपूर्ण कर्जमाफी योजनेत बसतात. त्यामुळे शेतक-यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी. ज्या शेतक-यांवर दीड लक्ष रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे, त्यांनी उर्वरीत रक्कम भरून दीड लक्ष रुपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा. वातावरण आणि हवामान आपल्या हातात नाही. नैसर्गिक कारणामुळे उत्पादनाला फटका बसला तर पीक विमा योजना त्यासाठी आधार आहे. या योजनेत खुप कमी रक्कम आपण खातेदार असलेल्या बँकेत किंवा महा-ई-सेवा केंद्रात भरावी लागते. त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो. पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2017 आहे. त्यामुळे या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतक-यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले.
                  चावडी वाचनात रामचंद्र बाबूराव मडावी, विनोद केशव राऊत, परमेश्वर शिवप्रसाद जयस्वाल,                      रियाजअली वाजिदअली, शिवप्रसाद जयस्वाल यांच्यासह अनेकांच्या सातबाराचे प्राथमिक स्वरुपात वाचन             करण्यात आले. सातबाराचे वाचन तलाठी आनंद चौधरी यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी येरकर                     यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 
                                        जिल्हाधिका-यांची रोपवाटिकेला भेट
                 रुई गावालगतच असलेल्या वनविभागाच्या रोपवाटिकेला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट              देऊन पाहणी केली. या रोपवाटिकेत किती रोपे आहेत. किती महिलांना यातून रोजगार मिळाला आहे, याबाबत          माहिती घेतली. तसेच उपलब्ध असलेल्या सर्व जमिनीवर रोपवाटिकेचा विस्तार करा, अशा सुचना त्यांनी वन             विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांना केल्या. 
                                                  000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी